म. टा. प्रतिनिधी, सांगली: पोटच्या मुलानेच त्याच्या बायकोच्या मदतीने वृद्ध आई-वडिलांना मारहाण करीत घराबाहेर काढले. जन्मदात्यांनाच घरातून हाकलण्यापूर्वी मुलाने गोड बोलून त्यांची मालमत्ता नावावर करून घेतली. या संतापजनक प्रकारानंतर आई गीता विलास पवार (वय ६७) यांनी शहर पोलीस ठाण्यात मंगळवारी (ता. १५) फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मुलगा राजेश विलास पवार आणि सून वर्षा राजेश पवार (रा. जुना बुधगाव रोड) या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सांगली शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गीता पवार या पती, मुलगा आणि सुनेसह सांगलीतील जुना बुधगाव रोड परिसरातील ईदगाह मैदानासमोरील घरात राहात होते. घर आणि इतर स्थावर मालमत्ता त्यांच्याच नावावर आहे. त्यांचा मुलगा राजेश याने पत्नीशी संगनमत करून आई, वडिलांना त्यांच्या नावावरील मालमत्ता आपल्या नावावर करण्याची गळ घातली. गोड बोलून त्यांनी घरासह मालमत्ता हस्तांतरीत करण्यासाठी आई, वडिलांना तयार केले. विश्वास संपादन केल्यानंतर १७ जुलै २०२० रोजी त्याने आईकडून सर्व संपत्तीचे बक्षीस पत्र स्वत:च्या नावावर करून घतले. यानंतर काही दिवसातच मुलगा आणि सुनेने आई-वडिलांकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. वारंवार किरकोळ कारणांवरून वाद घालू लागले. या दोघांनीही आई-वडिलांचा सांभाळ करण्यास असमर्थता दर्शवत त्यांना घराबाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतर मुलाने व सूनेने वृद्ध दाम्पत्याला मारहाण करून घरातून बाहेर काढले.

या वयात आपण जायचे कुठे, या विवंचनेत असलेल्या दाम्पत्याने अखेर सांगली शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी मुलगा आणि सुनेविरोधात तक्रार दाखल करून न्याय देण्याची मागणी केली. पोलिसांनी मुलगा राजेश विलास पवार आणि सून वर्षा राजेश पवार या दोघांविरोधात नागरिक आणि पालक यांचे पालन पोषण आणि कल्याण अधिनियम २००७ च्या कलम २४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास सांगली शहर पोलिसांकडून सुरू आहे.

आणखी बातम्या वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here