लखनऊः अयोध्येतील बाबरी मशिद प्रकरणी सीबीआय विशेष न्यायालय ३० सप्टेंबरला निकाल देणार आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने निकालाच्या दिवशी सर्व आरोपींना हजर राहण्यास सांगितलं आहे. न्यायालयाने भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह इतर आरोपींना नोटीस पाठवली आहे.

अयोध्येतील बाबरी मशिद प्रकरणी १ सप्टेंबर रोजी ही सुनावणी पूर्ण

अयोध्येतील बाबरी मशिद ढासळल्या प्रकरणी सर्व पक्षांचे युक्तिवाद, साक्ष, उलटतपासणी ऐकल्यानंतर विशेष सीबीआय न्यायालयाने १ सप्टेंबर रोजी सुनावणी पूर्ण केली होती. न्यायालयाने २ सप्टेंबरपासून निकाल लिहिण्यास सुरवात केली. याआधी वरिष्ठ वकिल मृदल राकेश, आयबी सिंह आणि महिपाल अहलुवालिया यांनी आरोपींच्या बाजूने युक्तिवाद केला. यानंतर सीबीआयचे वकील ललितसिंग, आरके यादव आणि पी. चक्रवर्ती यांनी युक्तिवाद केला.

अडवाणी-जोशी यांच्यासह एकूण ३२ जण आरोपी

दोन्ही बाजूंचे युक्तिवाद झाल्यानंतर विशेष न्यायाधीश एस. यादव यांनी २ सप्टेंबरपासून निर्णय लिहिण्यास सुरूवात केली होती. या प्रकरणात ३२ आरोपी आहेत. यात माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, माजी केंद्रीय मंत्री मुरली मनोहर जोशी, माजी मुख्यमंत्री उमा भारती, साक्षी महाराज, साध्वी ऋतंभरा, विश्व हिंदू परिषदेचे नेते चंपत राय यांचा समावेश आहे.

३५१ साक्षीदारांचे जबाब

सीबीआयने या प्रकरणी आरोपींविरोधात ३५१ साक्षीदार आणि सुमारे ६०० कागदपत्रे सादर केली आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ठरवलेल्या वेळेनुसार या महिन्याच्या अखेरीस न्यायाधीशांना या प्रकरणी निकाल द्यावा लागणार आहे. महत्त्वाचे म्हणजे ६ डिसेंबर १९९२ ला अयोध्येतील वादग्रस्त बाबरी मशिद करसेवकांनी पाडली होती.

बाबरी मशिद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

सर्वोच्च न्यायालयाने या खटल्याशी संबंधित प्रकरण ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले होते . पण काही कारणांमुळे विशेष न्यायालयाला हा खटला ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करता आला नाही. यामुळे हा खटला एक महिना पुढे गेला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here