नवी दिल्लीः पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवर चीनशी तणाव कायम आहे. या मुद्द्यावर केंद्र सरकारने बुधवारी सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. ही बैठक संपली आहे. आता संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उद्या दुपारी १२ वाजता राज्यसभेत भारत-चीन सीमावादावर निवेदन देणार असल्याचं सांगण्यात येतंय.

लडाखमध्ये चीनबरोबर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारने बुधवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली. या बैठकीला अनेक राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते. चीनशी सुरू असलेल्या तणावावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत निवेदन दिलं होतं. त्यावर ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

भारत-चीनमधील तणावावर सरकारने लोकसभेत निवेदन दिलंय. पण यावर विरोधी पक्षांनी सविस्तर चर्चेती मागणी केली. ही मागणी फेटाळल्याने कॉंग्रेसने लोकसभेतून सभात्याग केला होता. पण सरकारकडून चर्चेसाठी ही बैठक बोलवण्यावर भर देण्यात आला.

संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं आणि प्रश्नोत्तराचा तास रद्द केला गेला. त्यावर कॉंग्रेस, टीएमसीसह अनेक विरोधी पक्षांनी सरकारवर निशाणा साधला. चीनच्या मुद्द्यावर सरकारने चर्चेपासून पळ काढल्याचा आरोप त्यांनी केला.

लडाखची परिस्थिती गंभीर आहे आणि एलएसीची सद्य स्थिती बदलण्याचा चीनचा प्रयत्न आहे, असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेतील निवेदनात दिली. हा वाद वाटाघाटीद्वारे सोडवायचा आहे. पण परिस्थिती बदलल्यास भारतीय सैन्य सज्ज आहे, असं राजनाथ सिंह म्हणाले.

कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात कॉंग्रेस आणि विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. चीनशी सुरू असलेल्या तणावावर सरकार देशाची दिशाभूल करत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हे चीनला घाबरत आहेत, अशी टीका राहुल गांधींनी केली. केंद्रातील मोदी सरकारने चीन मुद्द्यावर वेगवेगळी विधानं केल्याचा दावा, राहुल यांनी बुधवारीही केला.

गृह मंत्रालयानेही चीनच्या मुद्दय़ावर दिले निवेदन

राज्यसभेत बुधवारी गृहमंत्रालयाने चीन मुद्द्यावर उत्तर दिले. गेल्या ६ महिन्यांत चीनने सीमेवर कोणतीही घुसखोरी केलेली नाही, असं म्हटलं आहे. यावर राहुल गांधींनी प्रश्न उपस्थित केले आहेत. तर लडाखमध्ये चीनने घुसखोरी केली नसून एलएसीचे उल्लंघन केल्याचं सरकारकडून सांगण्यात येतंय.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here