नवी दिल्लीः महाराष्ट्राचे आराध्य दैवत तसेच महाराष्ट्राच्या अस्मितेचा सर्वोच्च अभिमान बिंदू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणाऱ्या एका पुस्तकाचे भाजपच्या कार्यालयात प्रकाशन करण्यात आले आहे. ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ असे या पुस्तकाचे नाव आहे. या पुस्तक प्रकाशनानंतर देशभरातून भाजपवर टीकेची झोड उठवली जात आहे. तात्काळ या पुस्तकावर बंदी घालण्यात यावी या मागणीसह सोशल मीडियावरून संताप व्यक्त केला जात आहे.

दिल्लीतील भाजपचे नेते जयभगवान गोयल यांनी हे पुस्तक लिहिले आहे. भाजपाच्या दिल्लीतील कार्यालयात धार्मिक, सांस्कृतिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी या भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हे पुस्तक प्रकाशीत करण्यात आले. दिल्लीमध्ये लवकरच विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपने धार्मिक सांस्कृतिक मेळाव्याचे आयोजन केले होते. पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आल्यानंतर जय भगवान गोयल यांनी याची माहिती ट्विटरवरून दिली आहे. त्यांच्या या ट्विट नंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे.

या पुस्तक प्रकाशनाचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. शिवाजी महाराज हे एकमेवाद्वितीय आहेत. त्यांच्याशी तुलना होऊ शकणारा माणूस अजून जन्माला आलेला नाही आणि येणारही नाही. या पुस्तकावर तात्काळ बंदी घालण्यात यावी, अशी मागणी सोशल माध्यमातून केली जात आहे. मोदींची तुलना थेट छत्रपती शिवरायांसोबत करण्यात आल्याने शिवप्रेमींमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यावर आक्षेप घेतला आहे. जगाच्या अंतापर्यंत दुसरे छत्रपती शिवाजी महाराज होणे नाही, असे ट्विट आव्हाड यांनी केले आहे. आव्हाडानंतर काँग्रेसचे माजी खासदार राजीव सातव यांनीही यावर आक्षेप घेत भाजपने शिवरायांचा अपमान केला आहे, असे म्हटले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here