संत गोरोबाकाका साहित्य नगरी, उस्मानाबाद

‘सरकारने पॅकेज दिले. तरीही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाहीत. हे प्रकार रोखण्यात सरकार कमी पडत असताना शेतकऱ्यांना समजून घ्यायला आपण कमी पडत आहोत. पळत जाणाऱ्या माणसाला पायात पाय घालून पाडायचे आणि लागले का म्हणून विचारायचे असे सरकारचे धोरण आहे. शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’ येत नाहीत. ‘मन की बात’ न करता ‘काम की बात’ केली तर शेतकरी जगेल. पोशिंद्याला भिकार करण्याचे काम सरकारतर्फे सुरू आहे,’ अशी घणाघाती टीका साहित्य संमेलनात रविवारी झाली.

‘महात्मा फुलेंचा शेतकऱ्याच्या आसूड : आजच्या संदर्भात’ या विषयावर संमेलनात चर्चा झाली. अध्यक्षस्थानी डॉ. शेषराव मोहिते होते. ‘महाराष्ट्र टाइम्स’चे वरिष्ठ सहायक संपादक विजय चोरमारे, अभ्यासक गुरय्या स्वामी, लेखक रवींद्र शोभणे व अभ्यासक कैलास दौंड चर्चेत सहभागी झाले मोहिते

‘व्यक्त होण्यास जागा नाही’

‘महात्मा फुले यांनी १८८३ मध्ये ‘शेतकऱ्याचा आसूड’ लिहिला. दोन वर्षांनंतर वाङ्मयदृष्ट्या महत्त्वाची घटना घडली. १८८५ मध्ये आयोजित ग्रंथसंमेलनाचे निमंत्रण फुले यांना मिळाले. संमेलनात सामान्यांच्या प्रश्नांची चर्चा होत नाही, अशी भूमिका फुले यांनी घेतली,’ ही घटना चोरमारे यांनी आवर्जून अधोरेखित केली. ‘महिनाभरापूर्वी सरकार बनवण्याची कसरत सुरू होती, तेव्हा ३०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. मनमोहन सिंग सरकारने आणि आत्ताच्या सरकारने पॅकेज दिले. तरीही आत्महत्या थांबत नाहीत. सरकार कमी पडत असताना माणसांना समजून घ्यायला आपण कमी पडत आहोत. माणसांना व्यक्त व्हायला जागा नाही. शेतकरी दुष्टचक्रातून जात आहे. शेतीतून उदाहरनिर्वाह अवघड झाला आहे. शेतकऱ्याला समजून घेण्याची संवेदनशीलता नागरिकाला दाखवावी लागेल आणि लिहिणाऱ्यांना याकडे अधिक जबाबदारीने पाहावे लागेल,’ याकडे चोरमारे यांनी लक्ष वेधले.

‘शोषणाची केंद्रे बदलली’

‘शेतकऱ्याच्या मूळ प्रश्नांशी भिडणे अवघड झाले आहे. शोषणाची केंद्रे बदलली आहेत. शेतकऱ्यांमध्येही श्रीमंत व गरीब असे गट झाले आहेत. सोसायटी वगैरे संस्था श्रीमंत शेतकऱ्यांच्या हाती आहेत. गरीब शेतकरी राजकारणाच्या केंद्रस्थानी नाही. त्याला साधे कर्जही मिळत नाही म्हणून तो सावकाराकडून कर्ज घेतो. शेतकऱ्याची पिळवणूक होत आहे. श्रीमंत गटाला सुशिक्षित करण्याची गरज आहे,’ असे कैलास दौंड यांनी नमूद केले.

‘पळत जाणाऱ्या माणसाला पायात पाय घालून पाडायचे आणि लागले का म्हणून विचारायचे असे सरकारचे धोरण आहे. शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’ नाहीत. ‘मन की बात’ न करता ‘काम की बात’ केली तरच शेतकरी जगेल. पोशिंद्याला भिकार करण्याचे काम सरकारने केले,’ अशी टीका गुरय्या स्वामी यांनी केली. ‘साखर कारखाने, सूत गिरण्या शेतकऱ्यावर जगतात. शेतकऱ्याला कर्ज देताना भीक दिल्यासारखे वागवले जाते. मग तो सावकार लोकांकडे जातो आणि गळफास घेतो. तरुण शेतकऱ्याचे लग्न होत नाही,’ असे निरीक्षण त्यांनी नोंदवले.

‘आमची पुस्तके वाचू नका; पण कृषिमंत्र्याने किमान आसूड हे पुस्तक तरी वाचावे. सरकारी यंत्रणा केवळ घोषणाबाजी करते. शेतकऱ्याबद्दल आस्था दिसत नाही. शेतकऱ्याने सजग झाले पाहिजे. शेतीची नव्याने मांडणी केली पाहिजे. शेतकऱ्यांप्रमाणे सुशिक्षित तरुणांच्या आत्महत्यांचे प्रकार वाढू शकतात.’

– रवींद्र शोभणे

मूळ प्रश्नांना हात घालायचा नाही आणि निवडणूक जवळ आली की कर्जमाफीची घोषणा करायची. अशाने आत्महत्या थांबणार नाहीत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे केवळ दयेने बघून चालणार नाही. मृत्यूचे दरवाजे बंद करायला सरकार तयार नाही. सरकार बाकीचे उद्योग करते. डाव्या किंवा उजव्यांनी शेतकऱ्यांचा विचार केला नाही. जमिनीचे फेरवाटप केले म्हणजे प्रश्न मिटतील, असा भंपक युक्तिवाद केला जातो. शेतकऱ्याचा नोकरदार मुलगा हाच त्याचा शत्रू झाला आहे.

– डॉ. शेषराव मोहिते

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here