म.टा. प्रतिनिधी, नागपूरः ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक विचारवंत, लेखिका प्रा. सुशीला मूल -जाधव (वय ८१) यांचे बुधवार, १६ सप्टेंबर रोजी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास स्थानिक कामठी मार्गावरील व्हिनस हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गुरुवार, १७ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. प्रा. मूल-जाधव या काही दिवसांपासून नागपूर येथे राहत होत्या.

२९ ऑगस्ट रोजी कोव्हिड-१९ आजारामुळे त्यांना कामठी मार्गावरील आशा हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. तिथून त्यांना ७ तारखेला सुटी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने १० सप्टेंबर रोजी व्हिनस हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. गेल्या एक वर्षापासून त्या नागपूर येथेच वास्तव्यास होत्या. नामांतर आंदोलनात त्यांचा सक्रीय सहभाग होता. त्यांच्या पश्चात भाची-भाचे व मोठा आप्तपरिवार आहे.

पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाणिज्य महाविद्यालयाच्या पाली विभागप्रमुख तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पाली व बुद्धीझम विभागप्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. ‘सम्बुद्ध’, ‘भगवान बुद्ध’, ‘तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय स्त्री,’ ‘पालिभाषा परिचय’, ‘बुद्धनीतीकथा’, ‘तू खरंच सुंदर आहेस’, ‘बेबीचा वाढदिवस’, ‘नामांतर शहीद गौरवग्रंथ’ यासह त्यांची विपुल ग्रंथसंपदा प्रकाशित आहे. त्यांच्या अनेक ग्रंथांना विविध पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. राज्य शासनाच्यावतीने प्रकाशित झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्रग्रंथाच्या १६व्या खंडाच्या पालिव्याकरण विषयक ग्रंथाच्या मुद्रीतशोधनाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली होती.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here