म. टा. प्रतिनिधी, पुणे: करोनाच्या विषाणूंपासून प्रभावी रोग प्रतिकारशक्ती तयार करणाऱ्या अंड्यांना सद्या विशेष मागणी वाढली आहे. त्यामुळे ‘संडे हो या मंडे’ असे म्हणत अंडी खाण्याचे प्रमाण अधिक वाढले असून त्यामुळे त्याचे दरही वाढले आहेत. त्यामुळे डझनासाठी ७० ते ८० रुपये मोजावे लागत असून एका अंड्यासाठी साडेसहा ते सात रुपये द्यावे लागत आहेत. मागणी अधिक राहणार असल्याने ग्राहकांवर जादा दराने अंड्याची खरेदी करण्याची वेळ आली आहे.
पुणे शहर आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागातही करोनाबाधितांची संख्या एक लाखाच्या पुढे गेली आहे. त्यात सक्रीय रुग्णांची संख्या ही १८ हजारापर्यंत पोहोचली आहे. शहरात ढगाळ, पावसाळी तसेच बदलत्या वातावरण आहेत. विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांना रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी विविध औषधांसह आता अंडी खाण्याचा सल्लाही वैद्यकतज्ज्ञ देत आहेत. परिणामी, अंडी खाण्याचे प्रमाण वाढले आहे. पुणे शहरात पुणे जिल्हा आणि विभागातील कुकूटपालनातून अंडीची आवक होत आहे. तसेच हैदराबाद येथूनही मोठ्या प्रमाणात अंडीची आवक होत आहे. या ठिकाणी उपनगरासह अन्य भागात अंड्याचे वितरण होत असते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times