वाचा:
संभाजीराजेंनी मुख्यमंत्री यांना या संदर्भात पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. ‘ प्रकरण अंतिम निर्णयासाठी मोठ्या खंडपीठाकडे सोपवताना सध्याच्या आरक्षणाला स्थगिती देण्याचा निर्णय नुकताच सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. या निर्णयाचे तीव्र पडसाद सध्या राज्यभरात उमटत आहेत. सरकारनं त्या भावनेचा आदर केला पाहिजे. अशा अडचणीच्या काळात पोलीस भरतीचा निर्णय जाहीर करणे हा मराठा समाजाला चिथावणी देण्याचा प्रकार आहे. या निर्णयाच्या विरोधात प्रतिक्रिया उमटणार हे माहीत असूनही सरकारनं पोलीस भरतीचे आदेश काढले, हे पूर्णतः चुकीचे आहे. मराठा समाजाला एकटे पाडण्याचा हा कुटील डाव तर नाही ना? अशी प्रतिक्रिया समाजातील जाणकारांकडून येत आहेत, असं संभाजीराजे यांनी पत्रात म्हटलं आहे.
‘मराठा समाज हा इतरांचे हक्क हिरावून घेऊ इच्छित नाही. त्यांना त्यांचा हक्क हवा आहे आणि या लढ्यात सर्व जातीसमूह मराठा समाजाच्या सोबत आहेत. मोठा भाऊ अडचणीत असल्यामुळे सर्व बहुजन समाज हा लहान भावाप्रमाणे मराठा समाजाच्या सोबत होता, आहे आणि राहणार,’ असंही संभाजीराजे भोसले यांनी म्हटलं आहे.
वाचा:
‘सरकारच्या आधीच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेश देण्यात यावेत आणि जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयातून आरक्षण कायम होत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारची नोकर भरती काढू नये. सध्याच्या परिस्थितीत नोकरभरती केल्यास त्याविरोधात समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रातील सामाजिक सौहार्द टिकवून ठेवण्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची आहे. आपण समाजाची भावना लक्षात घेऊन योग्य तो निर्णय घ्याल,’ अशी अपेक्षा संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times