वर्धा: महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्त गेल्या दोन वर्षांपासून मोठ्या उत्सवाचे उत्साहात प्रयत्न सुरू होते. त्यासाठीच सेवाग्राम विकास आराखड्यातून विकासाची कामे करण्यात आली. एक वर्षांपूर्वी केंद्र स्तरावर गांधी १५० साठी समिती स्थापन करण्यात आली होती, मुख्यमंत्री त्याचे सदस्य आहेत. पण २ आक्टोबर रोजी राज्यभर साजऱ्या होणाऱ्या गांधी १५० म्हणजेच महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती समारंभाच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने समिती गठीत करण्यात आली आहे. महाराष्ट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार या समितीचे अध्यक्ष असून या समितीवर एकूण सहा मुख्य व्यक्तींना घेण्यात आले आहे. यात महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री, पशु संवर्धन मंत्री, उद्योग मंत्री , ग्राम विकास राज्यमंत्री आणि राज्याचे अतिरिक्त सचिव या महत्वाच्या व्यक्तींचा समावेश आहे. सेवाग्राम तसेच राज्यातील विविध भागात महात्मा गांधी यांची जयंती साजरी होणार आहे, त्याच्या योग्य त्या अंमलबजावणीची जबाबदारी या समितीची असणार आहे.

महात्मा गांधी यांचे विचार पुढच्या पिढीसाठी जिवंत राहावे आणि ते जगात सर्वत्र पोहचावे यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न होत आहेत. गांधी जयंती निमित्ताने साजरे होणारे विविध उपक्रमावर देखरेख ठेवणे, नियंत्रण ठेवणे आणि मार्गदर्शन करणे याशिवाय वेळोवेळी आढावा घेण्याची जबाबदारी या समितीवर असणार आहे. तत्पूर्वी २०१८ मध्ये स्थापन करण्यात आलेली समिती रद्द करण्यात आली असून तिचे पुनर्गठन करून नव्याने शासनाने परिपत्रक काढले आहे. ही उच्चस्तरीय समिती विशेष म्हणजे सेवाग्राम येथील बापू कुटी महात्मा गांधी यांच्या आश्रमात साजऱ्या होणाऱ्या गांधींच्या १५० व्या जयंती सोहळ्याला नियंत्रण व देखरेख करणार आहे. काही दिवसापुर्वी राज्याचे पशु संवर्धन मंत्री तथा वर्ध्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी बैठक घेऊन सेवाग्राम चा आढावा घेतला होता. सेवाग्राम विकास आराखड्याची देखील पाहणी केली होती. लवकरात लवकर कामे पुर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सेवाग्राम विकासावर विशेष लक्ष आहे. तसेच गांधी १५० मध्ये कुठल्याही उणिवा राहणार नाही याचा प्रयत्न राज्य सरकार करीत आहे. त्या दृष्टीने गठीत झालेल्या समितीचे विशेष महत्व आहे. देशातील मोठे नेते आणि गांधीवादी सेवाग्राम येथील जयंती सोहळ्यात उपस्थित राहण्याची शक्यता आहे. गांधी परिवारातील नेते उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे.

महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करणे, त्यासाठी गांधी जयंतीनिमित्त राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमाचा आराखडा तयार करणे आणि त्याची अमलबजावणी करणे यात समितीची महत्वाची भूमिका असणार आहे.राज्याच्या ग्राम विकास मंत्रालयाने तसा शासन निर्णय काढला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here