मटा. प्रतिनिधी, पिंपरी: मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज विक्री करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून ३९ हजार ६०० रुपये किमतीचे १३.२० ग्राम मेफेड्रोन ड्रग्ज जप्त केले आहे. ही कारवाई बुधवारी (१६ सप्टेंबर) सायंकाळी साडेसात वाजता शाहूनगर, चिंचवड येथे करण्यात आली.
शुभम सुभाष घटक (वय २३, रा. काळेवाडी), हर्शल उर्फ बंटी किशोर पाटील (वय २८, रा. आकुर्डी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस कर्मचारी प्रसंग जंगीलवाड यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहूनगर चिंचवड येथील केएसबी चौकात दोघेजण ड्रग्ज विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी केएसबी चौकात सापळा रचून आरोपी शुभम आणि हर्शल या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज मिळाले. पोलिसांनी हे ड्रग्ज करत दोघांना अटक केली आहे. एमआयडीसी भोसरी पोलिस तपास करीत आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times