मुंबई:
नेते जयभगवान गोयल यांनी लिहिलेल्या ‘आज के शिवाजी – नरेंद्र मोदी’ पुस्तकावरुन वाद निर्माण झालेला असतानाच भारतीय जनता पक्षानं या पुस्तकासंदर्भातली पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. हे पुस्तक गोयल यांचं व्यक्तिगत लिखाण आहे; पक्षाचा त्याच्याशी काही संबंध नाही, असं भाजपचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केलं आहे. इतकेच नव्हे तर पुस्तकाचे लेखक जयभगवान गोयल यांनी माफी मागितली असून हे पुस्तक मागे घेतले आहे असे सांगत जावडेकर यांनी या पुस्तकामुळे निर्माण झालेल्या पडदा टाकला आहे.

तत्पूर्वी, मीडिया सेलचे सहसमन्वयक संजय मयूख यांनीही हे पक्षाच्या वतीने स्पष्ट केलं आहे. मयूख यांचं हे वक्तव्य भाजपने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरदेखील पोस्ट केलं आहे. ‘हे माझं व्यक्तिगत लेखन आहे. जर यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी ते मागे घेतो, असंही गोयल यांनी सांगितल्याची माझी माहिती आहे,’ असं मयूख म्हणाले. ते प्रकाशनही भाजपचं नाही, असंही त्यांनी सांगितलं.

नेमका वाद काय?

दिल्लीतील भाजपचे नेते जयभगवान गोयल यांनी हे पुस्तक लिहिले आहे. भाजपाच्या दिल्लीतील कार्यालयात धार्मिक, सांस्कृतिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी या भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हे पुस्तक प्रकाशीत करण्यात आले. दिल्लीमध्ये लवकरच विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपने धार्मिक सांस्कृतिक मेळाव्याचे आयोजन केले होते. पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आल्यानंतर जय भगवान गोयल यांनी याची माहिती ट्विटरवरून दिली. त्यांच्या या ट्विट नंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त केला गेला. शिवाजी महाराज हे एकमेवाद्वितीय आहेत. त्यांच्याशी तुलना होऊ शकणारा माणूस अजून जन्माला आलेला नाही आणि येणारही नाही. या पुस्तकावर तात्काळ बंदी घालण्यात यावी, अशी मागणी सोशल माध्यमातून केली जात आहे. मोदींची तुलना थेट छत्रपती शिवरायांसोबत करण्यात आल्याने शिवप्रेमींमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here