मुंबईः केंद्र सरकारने आणलेल्या नागरिकत्व सुधारित कायद्याला (सीएए) पाठिंबा देण्यासाठी मुंबईतील एका शाळेने विद्यार्थ्यांकडून पोस्टकार्डवर पंतप्रधानांसाठी संदेश लिहून घेतले. याची गंभीर दखल राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतली आहे. राज्यातील शालेय विद्यार्थांचा राजकीय कारणासाठी वापर करू देणार नाही, असे त्यांनी सांगितले आहे. विद्यार्थ्यांचा राजकीय वापर करण्यात येऊ नये यासाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने सर्व शाळांना नोटिस पाठवल्या आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील दयानंद बालक विद्यालय आणि दयानंद बालिका विद्यालयात सीएए समर्थनार्थ विद्यार्थ्यांकडून पोस्टकार्ड लिहून घेण्याचा प्रकार घडला होता. या पार्श्वभूमीवर या दोन्ही शाळांच्या मुख्याध्यापकांना शिक्षण उपनिरिक्षकांनी कारणे दाखवा नोटीस पाठवून याबाबत खुलासा करण्यास सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळांना शालेय शिक्षण विभागाकडून नोटीसा पाठवून याद्वारे विद्यार्थ्यांचा कोणत्याही राजकीय कामासाठी वापर होता कामा नये, असे आदेश देण्यात आले आहेत.

शालेय शिक्षण विभागाच्या या निर्णयावर भाजपाने टीका केली असून सीएएवरुन राजकारण सुरू असल्याचा आरोप भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे. सीएएला डाव्या संघटना आणि विरोधी पक्षांकडून जोरदार विरोध केला जात आहे. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपानेही मोहिमा सुरु केल्या आहेत. भाजपाकडून शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ तसेच विविध शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांकडून सीएएच्या समर्थनार्थ संदेश लिहून घेण्याचे तसेच बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांसाठी ‘थिंक टँक’ स्थापन करणार

शिक्षण क्षेत्रात बदल घडवण्यासाठी शालेय शिक्षण विभागातर्फे ‘थिंक टँक’ स्थापन करण्यात येणार आहे. यामध्ये समाजातील विविध घटकांना स्थान देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यात पालकांचाही समावेश करण्याचा विचार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here