नवी दिल्ली:
नागरिकत्व दुरुस्ती कायद्यासंदर्भात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राहुल गांधींनी सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदींना मी आव्हान देतो ती त्यांनी पोलिसांशिवाय कोणत्याही विद्यापीठात जाऊन दाखवावं. त्यांनी सांगावं की ते देशासाठी काय करणार आहेत.

जेएनयू आणि जामिया विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांच्या विरोधासंदर्भात राहुल म्हणाले की विद्यार्थ्यांचा आवाज दाबला जाऊ शकत नाही. विद्यार्थ्यांना नोकऱ्या कशा मिळणार, देशाची अर्थव्यवस्था ताळ्यावर कधी येणार, याची उत्तरे पंतप्रधान मोदींनी द्यायला हवीत. राहुल पुढे म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींना तरुणांशी बोलण्याचं साहस असायला हवं. त्यांनी त्यांना सांगायला हवं की अर्थव्यवस्था संकटात आहे. विद्यार्थ्यांसमोर उभं राहण्याची त्यांची हिंमत नाही.’

अनेक विरोधी पक्षांनी या बैठकीला दांडी मारली त्यावर विचारता मात्र राहुल यांनी मौन बाळगलं. ‘देशातल्या युवकांच्या समस्यांची सोडवणूक करण्याऐवजी पंतप्रधान लोकांची दिशाभूल करत आहेत आणि त्यांच्यात फूट पाडत आहेत. तरुणाईचा आवाज योग्य आहे, तो दाबला जाऊ शकत नाही.’

रस्त्यावर उतरणार विरोधक

डाव्यांचे नेते डी. राजा यांनी सांगितले की विरोधी पक्षांनी २३, २६ आणि ३० जानेवारीला नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनात ‘देश वाचवा, लोकशाही वाचवा, संविधान वाचवा’ अशा घोषणा देण्यात येणार आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here