म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

‘नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत दिल्लीत बैठक सुरू असून, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी आमचा संपर्क झाला आहे. माझे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी, तसेच काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्याशीही बोलणे झाले आहे. संवादातील अभावामुळे थोडी गडबड झाली असली तरी भविष्यात असे होणार नाही याची काळजी घेऊ’, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोमवारी स्पष्ट केले.

‘नागरिकत्व’बाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी याआधीच भूमिका स्पष्ट केली असून, कायद्यात ज्या काही त्रुटी आहेत, त्या दूर व्हाव्यात असे त्यांचे मत आहे. देशभरात या कायद्यावरून निर्माण झालेले वादळ पाहता सर्व स्तरांतून त्याला विरोध होत आहे. या कायद्याने हिंदू-मुसलमान अशी विभागणी करून तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्याला यश आले नाही. राज्यात सर्व जाती धर्माचे लोक असतात. जिथे भाजपची सत्ता आहे त्या राज्यांत सर्वात हिंसक आंदोलने झाली. हे सर्व पाहता जोपर्यंत काही गोष्टींबाबत स्पष्टीकरण होत नाही तोवर राज्यात हा कायदा जबरदस्तीने लादला जाणार नाही, अशी मुख्यमंत्री ठाकरे यांनी भूमिका घेतली. जे देशाचे नागरिक आहेत त्यांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही मग ते कोणत्याही जाती धर्माचे असोत, इतकी स्पष्ट भूमिका घेतल्यानंतर आमचे कुणाशी मतभेद असल्याचा प्रश्नच येत नाही, असेही राऊत म्हणाले.

कायद्याच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्रात काँग्रेसकडून दबाव आणला जात आहे का, या प्रश्नावर ‘दबावाचा प्रश्नच येत नाही’, असे राऊत यांनी स्पष्ट केले.

‘त्या’ पुस्तकाचा कपटादेखील येऊ देणार नाही
जय भगवान गोयल यांच्या पुस्तकाबाबत बोलताना, ‘शिवाजी महाराजांची कोणाशीही केलेली तुलना आम्ही सहन करणार नाही. महाराष्ट्रात हे पुस्तकच काय, पुस्तकाचा कपटा देखील येणार नाही’, असे राऊत यांनी स्पष्ट केले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here