पीएम केअर्स फंडच्या पारदर्शकतेबद्दल आज बोललं जातंय. पण त्याच लोकांनी पीएम नॅशनल रिलीफ फंड तयार करून पारदर्शकता बाळगली होती का? आणि ते अद्यापही नोंदणीकृत नाहीए. विरोधी पक्षांनी, विशेषत: कॉंग्रेसला पीएम केअर्स फंडबाबत प्रश्न उपस्थित करण्याचा कुठलाही अधिकार नाहीए, असं सीतारामन म्हणाल्या.
पीएम केअर्स फंडावरू याआधी शुक्रवारी लोकसभेत गदारोळ झाला. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील खासदारांनी एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी केली. या दरम्यान कॉंग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. गोंधळामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाचं कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब केलं.
लोकसभेत गदारोळाची सुरुवात अनुराग ठाकूर यांच्या वक्तव्यावरून झाली. अनुराग ठाकूर हे सभागृहात पीएम केअर्स फंडाचा हिशेब देत होते. यावेळी त्यांनी गांधी घराण्याचा उल्लेख केला आणि पीएम नॅशनल रिलीफ फंडाद्वारे लाभ मिळवलेल्यांची नावं जाहीर करण्याची धमकी दिली. त्यांच्या वक्तव्याला विरोधी पक्षाच्या खासदारांनी विरोध केला. अनुराग ठाकूर यांनी गांधी घराण्याचा नाव घेताच विरोधी पक्षाच्या खासदारांनी गदारोळ सुरू केला. अनुराग ठाकूर यांनी माफी मागावी, अशी मागणी विरोधी पक्षाच्या खासदारांनी लावून धरली.
सभागृहात कॉंग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी अनुराग ठाकूर यांच्यावर आक्षेपार्ह भाष्य केलं. ‘हिमाचलमधील हा *** कसा काय इथे आला? हा *** कुठून आला? चर्चेत नेहरूजी कुठून आले? आम्ही मोदीजींचे नाव घेतले आहे का?’, असं अधीर रंजन चौधरी म्हणाले. तसंच अनुराग ठाकूर यांनी माफी मागावी अशी मागणी त्यांनी लावून धरली. खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. गोंधळामुळे लोकसभेचं कामकाज पुन्हा-पुन्हा तहकूब करावं लागलं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times