म. टा. प्रतिनिधी, नगर: ‘नगर जिल्ह्यात करोना रुग्णांचा उच्चांक झालाय. तर, दुसरीकडे पालकमंत्री व जिल्ह्यातील तीन मंत्री, असे चार मंत्री नगरला लाभले. पण या मंत्र्यांचा कुठे पत्ता नाही, हे घराच्या बाहेर येईनात, अशीच परिस्थिती आहे,’ असा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी केला. ‘एखादा मंत्री कोविड पेशंटच्या संपर्कात आल्यानंतर चौदा दिवस क्वारंटाइन होतो. म्हणजेच लोकांचे काम करायचे नाही, त्यांना मदत करायची नाही, त्यासाठी मंत्री क्वारंटाइन होत आहेत,’ अशी टीकाही त्यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचा सेवासप्ताह चालू आहे. याअंतर्गत नगर तालुक्यातील बाराबाभळी येथे रक्तदान शिबिर झाले. यावेळी बोलताना मुंडे यांनी जिल्ह्यातील कोविड परिस्थितीवरून पालकमंत्री हसन मुश्रीफ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे या चारही मंत्र्यांवर त्यांचे नाव न घेता निशाणा साधला. याप्रसंगी भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर, माजी जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड, मनोज कोकाटे, दिलीप भालसिंग, बाळासाहेब महाडिक आदी उपस्थित होते.

नगर जिल्ह्यात कोविड रुग्णांचा उच्चांक झाला आहे. पण सरकारी कोविड सेंटरला प्रशासनाकडून पुरेसे साहित्य मिळत नाही. कोविड सेंटरला जेवण देणाऱ्यांचे पाच महिन्यांपासून बिले थकली आहेत. केंद्र सरकारकडून जिल्ह्याला पैसे प्राप्त झाले असले तरी त्याचे प्रशासनाकडून वितरण होत नाही,’ असे सांगत मुंडे म्हणाले, ‘नगर जिल्ह्यात चार मंत्री आहेत. तीन जिल्ह्याचे व एक पालकमंत्री. पालकमंत्र्यांनी दोन दिवसापूर्वी नगरला मिटिंग घेतली, व त्या मिटिंगनंतर त्यांना कोविड झाला व तेच क्वारंटाइन झाले. प्रत्येक महिन्यात एक तरी मंत्री क्वारंटाइन होतो. कोविड पेशंटच्या संपर्कात आल्यानंतर १४ दिवस काही मंत्री क्वारंटाइन होतात. म्हणजेच यांना लोकांचे काम करायचे नाही, त्यासाठी क्वारंटाईन व्हायचे. कारण आम्ही समाजात वावरत असताना कार्यकर्ते म्हणून कोविड सेंटरमध्ये काम करतो. पण आम्हाला क्वारंटाइन होण्याची वेळ आली नाही. पण मंत्र्यांना समाजाची सेवा करायची नाही, म्हणून त्यांना क्वारंटाइन व्हावे लागते. हे सर्वजण लोकांना फसवून सत्तेत आल्यामुळे त्यांच्या कारभार कुठेही व्यवस्थित चालू नाही. जनतेला यांना मदत करायची नाही, अशी भूमिका सरकारची आहे.’

मंत्र्यांच्या आशेवर आम्ही राहणार नाही

‘जिल्ह्यात असणाऱ्या मंत्र्यांनी कुठेही लोकांच्या मदतीसाठी वैयक्तिक कोविड सेंटर सुरू केले नाही. भाजपने मात्र लोकांना मदत करीत जिल्ह्यात कोविड सेंटर उभारण्यास सुरुवात केली आहे. आम्ही मंत्र्यांच्या आशेवर राहणार नाही. तसेच लोकांना देखील माहिती आहे की राज्यातील सरकार हे त्यांना फसवून आले आहे. कारण लोकांनी त्यांना बहुमत दिले नव्हते,’ असेही जिल्ह्याध्यक्ष मुंडे यांनी स्पष्ट केले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here