म. टा. प्रतिनिधी, : लॉकडाऊनमुळे रोजगार गेल्यानंतर आर्थिक अडचणीत सापडलेल्या बापाने आपल्या मुलाला दत्तक दिल्याचे सांगत चक्क ५ लाख रूपयांना विकल्याचा खळबळजनक प्रकार कोल्हापुरात उघडकीस आला आहे. करोनामुळे माणुसकी, नातीगोती यांचा अंतच झाल्याचे या घटनेने पुढे आले आहे. मुलाच्या आजीने जावयाचे हे बिंग फोडल्यानंतर सध्या मुलाचा ताबा द्यायचा कोणाला यावरून वाद सुरू झाला आहे. याबाबत सोमवारी बालकल्याण समिती निर्णय घेणार आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील काटेभोगाव येथील दिगंबर उर्फ उत्तम ज्योतिराम पाटील हा गेले दोन-तीन वर्षे कोल्हापुरात राहतो. तो चांदी कारागीर आहे. लॉकडाऊनच्या काळात तो बेरोजगार झाला. त्याची पत्नी गेली तीन वर्षे आजारी आहे. त्याला दोन मुले आहेत. आजारी पत्नीचा उपचार खर्च आणि मुलांना सांभाळणे अवघड होऊ लागल्याने त्याने पत्नी आणि एका मुलासह माहेरी पाठवले. त्यानंतर तो आणि दहा वर्षाचा मुलगा गंगावेश येथे राहू लागले. या काळात त्याला दारूचे व्यसन लागले. तो कर्जबाजारीही झाला. एका मुलालाही सांभाळणे अशक्य झाल्याने शेवटी त्याने या मुलाला दत्तक देण्याचा निर्णय घेतला.

उत्तम याने साळोखेनगर येथील गजेंद्र गुंजाळ या तृतीयपंथीयाशी संपर्क साधला. आपल्या मुलाला त्याने त्या तृतीयपंथीयास नोटरीद्वारे दत्तक दिले. हा कार्यक्रम मे महिन्यात झाला. जावयाजवळ नातू नसल्याचे लक्षात आल्यानंतर आजीने त्याच्याकडे चौकशी करण्यास सुरूवात केली. पण तो उडवाउडवीची उत्तरे देऊन टाळत होता. शेवटी आजीने कोल्हापुरातील एका सामाजिक संस्थेच्या मदतीने या मुलाला शोधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा हा मुलगा एका तृतीयपंथीयाकडे असल्याचे समजले. त्यानुसार ती पोलिसांच्या मदतीने त्या तृतीयपंथीपर्यंत पोहोचली. माझ्या नातवाला परत द्या अशी मागणी केली, तेव्हा यासाठी मी पाच लाख रुपये मोजले आहेत, ती रक्कम परत द्या आणि नातू घेऊन जा असे त्या तृतीयपंथीयाने सांगितले.

आपल्या जावयाने नातवाला पाच लाख रूपयास विकल्याचा आरोप आजीने पोलिसांकडे केला. त्यानुसार पोलिसांनी उत्तम आणि गुंजाळ याला मुलासह बोलावून घेतले. यावेळी मुलाने मात्र मी वडिलांकडे राहणार नाही, मी गुंजाळ यांच्याकडेच राहणार असे सांगत आजीकडे जाण्यासही नकार दिला. यामुळे या मुलाचे काय करायचे असा प्रश्न पोलिसांना पडला. शेवटी त्या मुलास येथील बालकल्याण संकुलात दाखल करण्यात आले आहे. सोमवारी बाल कल्याण समिती याबाबत सर्वांशी चर्चा करून निर्णय घेणार आहे.

सध्या तो मुलगा बालकल्याण समितीच्या ताब्यात आहे. सोमवारी त्याच्यासह वडील व आजी आणि इतर नातेवाईकांशी बोलून सत्यता पडताळून पाहण्यात येईल. त्यानंतरच मुलाचा ताबा कोणाला द्यायचा याबाबत निर्णय घेण्यात येईल.

पद्मजा तिवले, सचिव, बालकल्याण संकुल

आणखी बातम्या वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here