सीआयआयच्या ताज्या अहवालानुसार बिझनेस कॉन्फिडन्स इंडेक्स (बीसीआय) जुलै ते सप्टेंबर या काळात ५०.३ वर गेला आहे. हाच निर्देशांक एप्रिल ते जून या काळात ४१.० होता. यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात सीआयआयने म्हटले आहे की, व्यावसायिक विश्वास निर्देशांक (बीसीआय) वाढण्यामागे अपेक्षा निर्देशांकातील (ईआय) वाढही साह्यभूत ठरली आहे. अपेक्षा निर्देशांक एप्रिल ते जून या कालावधीत ४६ टक्के होता, जो जुलै ते सप्टेंबर या काळात ५५.२ वर गेला आहे.करोनाचे रुग्ण एका बाजूला वाढत असतानाच दुसऱ्या बाजूला व्यावसायिक वातावरणही पुन्हा निर्माण होऊ लागले आहे.
हे सर्वेक्षण करण्यासाठी सीआयआयने देशातील विविध क्षेत्रांतील तब्बल १५० कंपन्यांना प्रश्न विचारले. हे सर्वेक्षण ऑगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्यांत केले गेले. आर्थिक सुधारणा अनलॉकची प्रक्रिया सुरू केल्यामुळे होण्यास सुरुवात झाली असली तरी अनेक राज्यांनी पुन्हा लॉकडाउन करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे उद्योग व व्यवसायांना येऊ पहात असलेल्या गतीला वारंवार खीळ बसत आहे. अनेक राज्यांतून व्यवसाय किंवा उद्योग पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास बंधने आहेत. त्याचाही फटका उद्योग-व्यवसायांना तसेच पर्यायाने अर्थव्यवस्थेला बसतो आहे, याकडेही अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे.
सर्वेक्षणातील तथ्ये
– व्यवसाय व उद्योगांमध्ये आश्वासक वातावरण निर्माण होण्यात बाजारातील घटलेल्या मागणीचा मोठा अडसर असल्याचे ५० टक्के प्रतिसादकर्त्यांचे मत
– करोनापूर्वी काळात होते तसे व्यावसायिक वातावरण निर्माण होण्यास पुढील आर्थिक वर्षाची (२०२१-२२) पहिली तिमाही उजाडेल असे ३० टक्के प्रतिसादकर्त्यांना वाटते.
– चालू आर्थिक वर्षात देशाचा जीडीपी ४ टक्क्यांहून अधिक प्रमाणात आक्रसेल अशी भीती ३५ टक्के प्रतिसादकर्त्यांनी वर्तवली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times