वृत्तसंस्था,अलीगड

नागरिकत्व कायद्यावरून देशात अनेक ठिकाणी आंदोलने होत असताना भाजप नेत्यांनी सोमवारी चिथावणीखोर वक्तव्ये केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधी घोषणा देणाऱ्यांना जिवंत गाडण्यात येईल, असे धक्कादायक वक्तव्य उत्तर प्रदेशचे भाजप नेते रघुराजसिंह यांनी केले आहे. सीएएच्या अनुषंगाने जनजागृती करण्यासाठी अलिगड येथे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये त्यांनी हे वक्तव्य केले.

‘भ्रष्टाचारी, चोर आणि गुन्हेगार लोक मोदी तसेच योगी यांच्याविरोधात बोलत आहे. त्यांच्या नावाने मुर्दाबाद अशा घोषणा देत आहेत. मात्र, अशा पद्धतीने जाहीर घोषणा दिल्या, तर त्यांनी जिवंत गाडण्यात येईल,’ अशी धमकी रघुराज सिंह यांनी दिली. रघुराजसिंह यांच्या विधानाने वाद निर्माण झालेला असतानाच भाजपचे पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनीही त्यात तेल ओतले. सीएए-विरोधी आंदोलकांना भाजपचे सरकार असलेल्या राज्यांमध्ये कुत्र्यासारखे फटकावत आहेत, असे वक्तव्य करून भारतीय जनता पार्टीचे पश्चिम बंगाल प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी वादाचा धुराळा उडवून दिला आहे. नादिया येथील एका जाहीर सभेमध्ये ते बोलत होते. भाजपशासित आसाम, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकसारख्या राज्यांमध्ये सीएए विरोधी आंदोलनांचा खरपूस समाचार घेतला जात आहे. मात्र, पश्चिम बंगालमध्ये अशा पद्धतीने दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे तसेच लाठीचार्ज करण्याचे आदेश मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिले नाहीत. त्याबद्दल त्यांनी राज्य सरकारचा निषेध केला.

ममतांची खेळी

कोलकाता : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर नुकतीच पार पडलेली बैठक आणि नवी दिल्ली येथील विरोधकांच्या बैठकीला अनुपस्थित राहण्याची पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची खेळी म्हणजे विरोधकांच्या मतांचे विभाजन करण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाच्या पश्चिम बंगाल शाखेने केली आहे.

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी बोलविलेल्या बैठकीला ममता यांची अनुपस्थिती म्हणजे एक राजकीय खेळी आहे. तृणूल काँग्रेस आणि भाजपमध्ये काहीतरी शिजते आहे, असा संदेश पसरेल, अशा पद्धतीने त्या मुद्दाम वागत आहेत. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष ममता बॅनर्जी यांच्याविरोधात जोरकसपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. त्यामुळे ममता किंवा सध्याच्या सरकारच्या विरोधातील मतांचे विभाजन होईल, अशी शक्यता भाजपाच्या राज्यस्तरीय नेत्यांनी व्यक्त केली आहे.

अर्थात, तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. भाजप आणि भगव्या विचारांच्या संघटनांनी अशा पद्धतीने गोबेल्स तंत्र वापरून विचार पसरविणे थांबविले पाहिजे. तृणमूल काँग्रेसने सीएएविरोधी आंदोलनांच्या निमित्ताने काँग्रेसने केंद्र आणि नरेंद्र मोदी यांना जाहीरपणे शिंगावर घेतले आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत जाण्याची चर्चा देखील हास्यास्पद आहे, असे तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी म्हटले आहे.

भाजपचे कार्यालय उद्ध्वस्त

भारतीय जनता पक्षाचे पश्चिम बंगालमधील बर्धवान जिल्ह्यातील कार्यालय उद्धवस्त करण्यात आले. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केल्याचा दावा भाजप नेत्यांनी केला आहे. असनसोल येथील सालनपूर भागातील कार्यालय रविवारी पेटवून देण्यात आले. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा दावा केला जात असला, तरीही या कृत्यामागे तृणमूल कार्यकर्त्यांचाच हात आहे, असा भाजपचा दावा आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here