नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पुढाकारातून दिल्लीत भाजपच्या खासदारांचे शिष्टमंडळ संभाजी महाराजांना भेटले. यामध्ये खासदार रक्षा खडसे, खासदार डॉ. प्रीतम मुंडे, खासदार डॉ. भारती पवार, खासदार डॉ. हीना गावित, खासदार उन्मेष पाटील यांचा समावेश होता.
मराठा आरक्षणासंदर्भात न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. या आरक्षणासंदर्भात मराठा समाजाच्या भावना तीव्र आहेत. खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी पुढाकार घ्यावा. पंतप्रधानांना भेटून या प्रश्नातून मार्ग कसा काढता येईल, याबाबत चर्चा करावी अशी विनंती या शिष्टमंडळाने संभाजी महाराज यांना केली.
वाचा:
या भेटीबद्दल खासदार डॉ. विखे यांनी सांगितले की, ‘मराठा आरक्षणामुळे मराठा समाजाला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल. हा प्रश्न समाजाच्या जिव्हाळ्याचा असल्याने त्यावर लवकर आणि योग्य तोडगा निघणे अपेक्षित आहेत. त्यामुळे संभाजी महाराज यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली तर काही सकारात्मक तोडगा निघेल, असा विश्वास वाटतो. त्यामुळे आम्ही ही भेट घेतली. संभाजी महाराजांनीही यासाठी अनुकूलता दर्शविली आहे.’
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा समाजातून संतप्त भावना व्यक्त होत आहे. त्यासाठी आंदोलनेही सुरू झाली असून संघटनांकडून सरकार आणि राजकीय पक्षांना इशारेही देण्यात येत आहेत. छत्रपती संभाजी महाराज आणि खासदार उदयनराजे भोसले या दोघांनीही या प्रश्नात लक्ष घातले आहे. उदयनराजे यांनी अलीकडेच आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली आहे. या प्रश्नापुढे आपण पक्ष किंवा पद याला महत्व न देता समाजासोबत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
वाचा:
त्यानंतर भाजपच्या तरुण खासदारांच्या शिष्टमंडळाने दिल्लीत संभाजी महाराज यांची भेट घेत त्यांना पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे. प्रकरण कोर्टात असले तरी भाजपच्या माध्यमातून केंद्र सरकारमार्फत यावर काही तरी तोडगा निघावा, अशी या खासदारांची अपेक्षा आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times