वृत्तसंस्था, कोलकाता

भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या राज्यांत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करणाऱ्या निदर्शकांवर कुत्र्यागत गोळ्या झाडण्यात आल्या, असे अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केल्याने वाद उफाळला आहे.

नाडिया जिल्ह्यात रविवारी आयोजित एका जाहीर सभेत घोष बोलत होते. पश्चिम बंगालमध्ये नागरिकत्वविरोधात निदर्शने झाली. त्यात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले. राज्यातील ममता बॅनर्जी यांच्या सरकारने त्यांच्यावर गोळ्या चालवण्याऐवजी केवळ लाठीमार केला. कारण हे नुकसान करणारे त्यांचे मतदार होते. मात्र आमची सत्ता असलेल्या उत्तर प्रदेश, कर्नाटक, आसाम या राज्यांत अशी तोडफोड करणाऱ्यांवर कुत्र्यागत गोळ्या चालवण्यात आल्या, असे उद्गार घोष यांनी काढले.

घोष यांच्या या उद्गारांवर खुद्द त्यांच्याच भाजपमधून नाराजीचा सूर उमटला. नेते व केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी घोष यांचे विधान अत्यंत बेजबाबदार आहे, अशी प्रतिक्रिया नोंदवली. घोष यांच्या वक्तव्याशी भाजपचा काहीही संबंध नाही. उत्तर प्रदेश असो, किंवा आसाम, तेथील सरकारांनी असा गोळीबार वगैरे केलेला नाही, असे ट्विट सुप्रियो यांनी केले. त्याचवेळी, तृणमूल काँग्रेसने घोष यांच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here