. टा. प्रतिनिधी, सांगली: ग्रहण काळात गर्भवतीने भाजी चिरल्यास जन्माला येणाऱ्या बाळामध्ये व्यंग निर्माण होते, अशी आहे. या अंधश्रद्धेला मूठमाती देण्याचे काम इस्लामपूर (ता. वाळवा) येथील समृद्धी चंदन जाधव या महिलेने केले. २१ जून २०२० रोजी झालेल्या सूर्य ग्रहण काळात या महिलेने भाजी चिरली, फळे, फुले तोडली, जेवणही केले होते. नुकताच तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. हे बाळ निरोगी आणि सुदृढ असल्याने ग्रहण काळातील अंधश्रद्धांना मूठमाती मिळाली आहे.

ग्रहण पाळण्याची अंधश्रद्धा अजूनही अनेक ठिकाणी आहे. विशेषतः गर्भवती महिलांनी ग्रहण काळात काही पथ्ये पाळावित, असे सांगितले जाते. पथ्ये न पाळल्यास जन्माला येणा-या बाळात व्यंग निर्माण होते, अशी भीती घातली जाते. ही अंधश्रद्धा दूर करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या इस्लामपूर शाखेसह समृद्धी चंदन जाधव या तरुणीने पुढाकार घेतला. २१ जून रोजी झालेल्या सूर्य ग्रहण काळात समृद्धी यांनी भाजी चिरणे, पाने, फुले, फळे तोडणे, अन्नपदार्थ खाणे, पाणी पिणे, हाताची घडी घालणे, मांडी घालून बसण्याची कृती केली. तसेच सोलर फिल्टरमधून ग्रहणही पाहिले. या कृतीतून त्यांनी ग्रहणाबाबत असलेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला.

काही दिवसांपूर्वीच समृद्धीची प्रसूती झाली. तिने गोंडस मुलीला जन्म दिला. ही मुलगी निरोगी, सुदृढ आहे. तिच्यावर ग्रहणाचा कोणताही परिणाम झालेला नाही. मुलीसह तिच्या आईचीही प्रकृती ठणठणीत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

आपल्या अनुभवाबद्दल समृद्धी जाधव म्हणाल्या, ‘ग्रहणाचा मानवी जीवनावर, गर्भवती महिलेवर, तिच्या बाळावर कोणताही दुष्परिणाम होत नसल्याचे प्रबोधन अंनिसच्या कार्यकर्त्यांनी केले होते. यामुळेच मी आणि माझ्या कुटुंबीयांनी धाडसाचे पाऊल उचलले. आधुनिक काळात अशा अंधश्रद्धांना आपण बाजूला केले पाहिजे. यापुढील प्रत्येक ग्रहणात मी व माझे कुटुंबीय अंधश्रद्धा दूर करण्यासाठी प्रबोधन करणार.’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘अंधश्रद्धांमधून भीती तयार होते. त्यातून मानसिक गुलामगिरी तयार होते. या सर्वातून मुक्त करण्याचे काम जाधव कुटुंबीयांनी करून समाजापुढे एक नवा आदर्श उभा केला आहे. त्यांनी उचललेले पुरोगामी पाऊल कौतुकास्पद आणि अनुकरणीय आहे,’ अशी माहिती अंनिसचे राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे यांनी दिली. जाधव कुटुंबातील समृद्धी यांची सासू सिंधुताई, पती चंदन, दीर दीपक यांच्यासह प्रा. डॉ. नितीन शिंदे, प्रा. तृप्ती थोरात, विनोद मोहिते, प्रा. बी. आर. जाधव, अवधूत कांबळे, योगेश कुदळे, आदींनी प्रोत्साहन दिले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here