नवी दिल्लीः संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या संपूर्ण कामकाजातून आठ खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. यानंतर निलंबित खासदार संसदेच्या आवारात महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करत आहेत. रात्रभर आंदोलन करणार आणि निलंबन मागे घेत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन करत राहणार, असं निलंबित खासदारांनी म्हटलंय. हे खासदार आपलं निलंबन मागे घेण्याच्या सातत्याने मागणी करत आहेत. तर राज्यसभेच्या उपसभापतींना कुणीही हात लावलेला नाही, असं काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी सांगितलंय.

धरणे आंदोलनावर बसलेल्या निलंबित खासदारांना समर्थन देण्यासाठी गुलाम नबी आझादही पोहोचले. हे विधेयक शेतकऱ्यांना संपवणारं आहे. शेतकरीविरोधी आहे. हे विधेयक बळजबरीने राज्यसभेत मंजूर झालं आहे. यासाठी मतदानाची मागणी केली गेली होती. पण ती मान्य करण्यात आली नाही. एका खासदारानेही मत विभागणी मागणी केली. तरीही राज्यसभेत हे विधेयक आवाजी मतदानाने मंजूर केलं गेलं. राज्यसभेत बहुमत या विधेयकाच्या विरोधात होतं.

राज्यसभेत गदारोळ सुरू असताना खासदारांनी कोणावरही हात उचलला नाही. ना उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांच्यावर ना मार्शलवर. एक वाजेनंतर सभागृहाचं कामकाज वाढवायचं होतं तर सभागृहाचा विचार घेतला जातो. सभागृहाचा नकार असूनही कामकाजाची वेळ वाढवली गेली. जे खासदार नियम सांगत होते. प्रक्रिया सांगत होते आणि परंपरा सांगत होते, त्यांनाच सभागृहातून काढून टाकले गेले, असा आरोप गुलाम नबी आझाद यांनी केला.

निलंबित खासदारांचे रात्रभर आंदोलन

आंदोलनाला बसलेले खासदार रात्रभर धरणे देणार आहेत. राज्यसभेत उद्या काय निर्णय होतो यावर पुढील दिशा ठरवू, असं निलंबित खासदारांनी सांगितलं. राज्यसभेत मंगळवारी आमचं निलंबन मागे घेतलं जातं की नाही, यावर आंदोलनाची पुढील दिशा अवलंबून असेल, असं आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह म्हणाले. निलंबित खासदार रात्रभर संसदेच्या आवारात आंदोलन करणार आहेत. म्हणूनच खासदारांनी उशा आणि चादरीही सोबत आणल्या आहेत. खासदारांसाठी गरम होऊ नये म्हणून पंखेही लावण्यात आले आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here