‌म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

करोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला असून, अशात रेल्वे सुरू केल्यास प्रादुर्भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. अशावेळी सर्व गोष्टी व्यवस्थित पाहूनच रेल्वे सुरू करावी लागेल, असे सांगत परिवहनमंत्री यांनी सोमवारी आणखी काही दिवस सुरू न होण्याचेच संकेत दिले आहेत.

मुंबईत लोकलसेवा सर्वांसाठी खुली करण्यासाठी मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. याशिवाय सर्वसामान्यांकडूनही याबाबतची मागणी होत आहे. मात्र, सर्वांसाठी एवढ्यात रेल्वे लोकलसेवा सुरू होणार नाही, असेच दिसते. सध्या रेल्वेत फक्त शासकीय आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवास करण्याची परवानगी आहे.

याबाबत अधिक माहिती देताना परिवहनमंत्री म्हणाले की, सर्व गोष्टींची काळजी करून रेल्वे खुली करावी लागणार आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. त्यामुळे रेल्वे खुली केली, तर आणखी प्रादुर्भाव वाढेल. त्यामुळेच आम्ही लोकलसेवा टप्प्याने खुली करीत आहोत. आता रेल्वेच्या फेऱ्याही वाढविण्यात आल्या आहेत. याला आता कोणाला राजकीय स्वरूप द्यायचे असेल तर देऊ द्या, असेही ते म्हणाले.

एसटीबाबत बोलताना परब म्हणाले की, एसटी पूर्ण क्षमतेने सुरू झाली असली, तरी प्रवासी अजूनही प्रवास करायला धजावत नाहीत. दोन महिने उत्पन्न नव्हते. मात्र, तरीही आम्ही राज्य सरकारकडून ५०० कोटी रुपये घेऊन कर्मचाऱ्यांचे पगार दिले. आताही आम्ही राज्य सरकारकडे पैसे मागितले आहेत. राज्य सरकारकडे २२०० कोटी रुपयांची मागणी केली असून इंधन, पगार, सुटे भाग यासाठीचे हे पैसे मागितले आहेत. यातील ५५० कोटी मिळाले असून उर्वरित पैसे लवकर मिळतील. कोविडचा भत्ता द्यायचा शिल्लक आहे, करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांनाही मदत देणे बाकी असून आम्ही ते लवकर देऊ, असेही त्यांनी सांगितले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here