आग्रा: चार-चार गर्लफ्रेंडवर इंम्प्रेशन मारण्यासाठी त्यांना महागडे गिफ्ट देण्याच्या नादात चोरी करणाऱ्या एका तरुणाच्या पोलिसांनी अखेर मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्याकडून चोरीच्या पर्स, अपाचे बाइक आणि दोन मोबाइल जप्त करण्यात आले आहेत.

आग्रा येथील नेहरू नगर परिसरात एक महिला तिच्या पतीसोबत घरी जात असताना पाठिमागून आलेल्या बाइकस्वाराने तिच्या हातातून पर्स ओढून पळ काढला. या महिलेने त्याबाबत हरिपर्वत पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर आरोपी विष्णू चौहानला अटक करण्यात आली आहे. मात्र विष्णूची पोलिसांनी कसून चौकशी केली असता पोलिसांना अत्यंत धक्कादायक माहिती मिळाली. विष्णूच्या चार गर्लफ्रेंड असून तो या चारही गर्लफ्रेंडना वेगवेगळ्या वेळी भेटायला जातो. प्रत्येक भेटीत तो गर्लफ्रेंडला गिफ्ट द्यायचा. खिशात पैसे नसल्यास चोरी करून तो गिफ्ट घेऊन जायचा. खासकरून महिलांच्या पर्स चोरीवर त्याचा कटाक्ष असायचा. विशेष म्हणजे हायवेवरच तो चोरी करायचा. एकट्या महिलेला गाठून त्यांच्याकडील पर्स घेऊन पसार व्हायचा. हायवेवर सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे तो पोलिसांच्याही हाती लागत नसे, असं हरीपर्वत पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक अजय कौशल यांनी सांगितलं.

चोरी करण्यात सराईत झालेला विष्णू आठवड्यातून दोनदा चोरी करायचा. मात्र त्याच्याविरुद्धच्या तक्रारी नसल्याने त्याच्यावर कारवाई होत नव्हती, असंही पोलिसांनी सांगितलं. दरम्यान, एका महिलेच्या तक्रारीनंतर महिलांची पर्स चोरणाऱ्या विष्णूला पालीवाल पार्कमधील सुलभ शौचालयाजवळून अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी तीन पर्स जप्त केल्या आहेत. २०१७मध्येही एका प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती, असं पोलीस सूत्रांनी सांगितलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here