म.टा. प्रतिनिधी, नगर: करोनाच्या उपचारांसाठी खासगी रुग्णालयांतून देण्यात येणारी वाढीव बिले सध्या चर्चेचा विषय आहे. त्याविरोधात ओरड सुरू झाल्याने सरकारने बिले तपासण्याची यंत्रणा निर्माण केली. नगरचे खासदार डॉ. यांनी मात्र खासगी डॉक्टरांची बाजू थेट लोकसभेत उचलून धरली. एका चर्चेत भाग घेताना डॉ. विखे यांनी हा मुद्दा उपस्थित केला.

खासगी रुग्णालयांच्या जादा बिलांसंबंधी सरसकट होणारे आरोप चुकीचे आहेत. करोना काळात अनेक अडचणींवर मात करीत सेवा देताना डॉक्टरांचा खर्च वाढला आहे. त्यामुळे सहाजिकच रुग्णसेवेच्या खर्चात वाढ होत आहे. २० टक्के रुग्णालयांत असे प्रकार होत असतील, पण बाकीच्या ८० टक्के रुग्णालयांना यामुळे दोष देता कामा नये, असे डॉ. विखे पाटील म्हणाले.

संसद अधिवेशनात संसर्गजन्य रोगांविषयी चर्चेत डॉ. विखे यांनी सहभाग घेतला. ते म्हणाले, ‘मागील काही महिन्यांपासून डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका अशा अनेकांनी जीवाची बाजी लावून रुग्णांना सेवा पुरविली त्याबद्दल त्यांनी आभार मानले. खाजगी रुग्णालयांकडून वाढीव स्वरूपातील बिल आकारणीचा विषय उपस्थित केला. रुग्णसेवा देण्यासाठी ज्या गोष्टी लागतात, जे मनुष्य बळ लागते त्यांचा खर्च आता पूर्वीपेक्षा वाढला आहे. मनुष्यबळ उपलब्ध होणे अवघड झाले आहे. त्यासाठी डॉक्टरांना जास्त पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे रुग्णांना वाढीव बिलांना सामोरे जावे लागत आहे. सरकारने लवकरात लवकर याबाबतीत निर्णय घ्यावा.’

नगरमध्ये डॉ. विखे आणि जिल्हा प्रशासन यांच्यात लॉकडाउन आणि इतर उपाययोजनांसंबंधी मतभेद झाले होते. हा विषयही विखे यांनी आपल्या भाषणात घेतला. ते म्हणाले, ‘लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता सुरू असलेली प्रशासकीय कामे व उपाययोजनांमुळे प्रशासन व लोकप्रतिनिधींमध्ये ताळमेळ राहिला नाही. केंद्र सरकारकडून येणारी सामग्री व निधी वापरात येत आहे, परंतु याबद्दल अनेक लोकप्रतिनिधींना याची माहिती दिली जात नाही. सरकारी डॉक्टरांप्रमाणेच खाजगी डॉक्टर देखील जीवाची बाजी लावून रुग्णसेवा देत आहेत. त्यातील अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. यामुळे डॉक्टरांना देखील विमा कवच उपलब्ध करून देण्यात यावे.’ असेही ते म्हणाले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here