म.टा.प्रतिनिधी, नगर: रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नावरून नगरमध्ये राजकारण चांगलेच तापू लागले आहे. खड्डयांच्या मुद्द्यावरून शिवसेना-भाजप आमने-सामने आले असून हा प्रश्न चांगलाच पेटण्याची चिन्हे आहेत.

नगरमधील रस्त्यांची दुरवस्था झाली असून ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. त्यातच पावसाचे पाणी खड्ड्यात साचत असल्यामुळे वाहनचालकांचे हाल होत आहेत. नगर महापालिकेवर भाजपची सत्ता असल्यामुळे यानिमित्ताने विरोधकांना भाजपला घेरण्याची चांगलीच संधी मिळाली आहे. मात्र, हा मुद्दा विरोधकांनी उचलण्यापूर्वीच महापौर बाबासाहेब वाकळे यांनी शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न उचलला. नगरमधून जाणाऱ्या महामार्गावरील खड्डे बुजवत हे महामार्ग पंधरा दिवसाच्या आत दुरुस्त न केल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना काळे फासू, असा इशाराच महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिला. काल, सोमवारी तसे पत्रही त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता यांना दिले. मात्र, आज या पत्रावरूनच शिवसेनेने वाकळे यांना लक्ष करीत भाजपवरच निशाणा साधला आहे.

नगर शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील खड्डे न बुजविल्यास अधिकाऱ्यांना काळे फासण्याची भाषा नगरचे महापौर करीत आहेत. मग नगर शहरातील रस्त्यांच्या अवस्थेचे काय ? असा प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला आहे. मनपा आयुक्त, महापौर शहरातील रस्ते दुरुस्त करण्याची जबाबदारी का झटकत आहेत ?, अशी टीकाही शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी केली आहे. तसेच शिवसेनेने आज चक्क मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनाच खड्डेमय रस्त्यावरून पायी फिरवले. यावेळी मनपा प्रशासनासह महापौर वाकळे यांच्या विरोधातही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे आता खड्ड्यांच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलेच रंगत असले तरी ही समस्या सुटणार का, याकडे नागरिकांचे लक्ष आहे.

मनपा सत्ताधाऱ्यांवर काँग्रेसचा निशाणा

पंधरा दिवसांच्या आत महामार्गांवरील खड्डे बुजवले नाही तर अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा इशारा महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिला. त्यावर मनपातील सत्ताधाऱ्यांनी नगर शहरातील खड्डे पंधरा दिवसांच्या आत बुजवले नाही, व त्यामुळे नगर शहरातील नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला तर त्यांनी वाईट वाटून घेऊ नये, असा खोचक सल्ला काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी महापौर यांचे नाव न घेता त्यांना दिला आहे. तसेच पंधरा दिवसांच्या आत जर महापालिकेने खड्ड्यांची दुरुस्ती केली नाही, तर मनपा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही काळे यांनी दिला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here