वाचाः
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती देऊन हा मुद्दा खंडपीठाकडे सोपवण्याचा सल्ला दिल्यानंतर राज्यात मराठा समाज आक्रमक बनला आहे. नोकरी आणि शिक्षणातील १३ टक्के आरक्षण कायम राहावे, या मागणीसाठी सकल मराठा समाज आंदोलनांद्वारे सरकार आणि न्यायव्यवस्थेचे लक्ष वेधत आहे. मंगळवारी सांगली जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने लोकप्रतिनिधींच्या घरासमोर हलगी बजाव आंदोलन करण्यात आले. सांगली शहरात भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या घराबाहेर हलगी वाजवून आंदोलकांनी त्यांच्याकडे मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हा समन्वयक डॉ. संजय पाटील म्हणाले, ‘सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती हा मराठा समाजावरील अन्याय आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्यात आरक्षणाची अंमलबजावणी सुरू झाली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मराठा समाजासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. स्थगिती उठविण्यासाठी राज्य सरकारने तातडीने पुढील पावले उचलावीत, तसेच आरक्षणाचा निर्णय झाल्याशिवाय पोलिस भरती प्रक्रिया सुरू करू नये. अन्यथा संपूर्ण मराठा समाज रस्त्यावर उतरेल, याची राज्य सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी.’
वाचाः
मराठा क्रांती मोर्चाचे निवेदन स्वीकारल्यानंतर आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले, ‘देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले. मात्र, हे आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकवण्यासाठी सध्याच्या सरकारने विशेष प्रयत्न केले नाहीत. कोर्टात मराठा समाजाची बाजू भक्कमपणे मांडली नाही. आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत या समाजाला तातडीने अन्य सुविधा दिल्या जाव्यात. आरक्षणासह विविध प्रकारच्या सुविधांसाठी भाजपा नेहमीच मराठा समाजासोबत राहील. सांगली शहरासह जिल्ह्यात इस्लामपूर, कडेगाव, शिराळा, विटा, आटपाडी, तासगाव येथे आंदोलन करण्यात आले. शुक्रवारी जिल्ह्यात ठिय्या आंदोलन केले जाणार आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times