पाटणाः बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी व्हीआरएससाठी अर्ज केला होता. भारतीय पोलिस सेवेतील वरिष्ठ पोलिस अधिकारी असलेल्या पांडे यांचा व्हीआरएस अर्ज राज्यपालांनी स्वीकारला आहे. व्हीआरएस घेतल्यानंतर आयपीएस पांडे हे राजकारणात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

गुप्तेश्वर पांडे यांच्या ट्विटनेही या चर्चांना आणखीनच उधाण आलं आहे. पांडे हे बुधवारी आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. ‘मेरी कहानी, मेरी जुबानी’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बुधवारी लाइव्ह येत असल्याचं त्यांच्या राजकारणातील सक्रियतेचे संकेत म्हणून पाहिलं जात आहे.

दुसरीकडे सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी आरोपी असलेली अभिनेत्री रिया चक्रवर्तीचे वकील सतीश मानेशिंदे यांनी बिहार पोलिस प्रमुखांच्या व्हीआरएसवर ताशेरे ओढले आहेत. डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांच्या व्हीआरएसच्या अर्जावर बिहार सरकार आणि केंद्र सरकारने २४ तासांपेक्षा कमी वेळात निर्णय घेतला. बिहार सरकारने रियाविरूद्ध एफआयआर ज्या पद्धतीने सीबीआयकडे दिली आणि केंद्राने त्याला मंजुरी दिली त्याप्रमाणेच हे आहे, असा आरोप सतीश मानेशिंदे यांनी केला आहे.

हे जस्टिस फॉर सुशांतसिंह राजपूत नसून जस्टिस फॉर गुप्तेश्वर पांडे आहे, अशी टीका सतीश मानेशिंदे यांनी केलीय. सुशांतसिंह प्रकरणात नोंदवण्यात आलेल्या एफआयआर आणि तपासासाठी बिहार पोलिसांची टीम मुंबईत गेल्यानंतर गुप्तेश्वर पांडे चर्चेत आले होते.

गुप्तेश्वर पांडेदेखील माध्यमातून सतत झळकत होते. रियाची लायकी नाहीए मुख्यमंत्री नितीशकुमारांवर टीका करण्याची, असं पांडे म्हणाले होते. विशेष म्हणजे सुशांत प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन चौकशी करणार्‍या नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) रिया चक्रवर्तीला अटक केली आहे.

गुप्तेश्वर पांडे यांनी २००९ मध्ये बक्सर लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यासाठी व्हीआरएस घेतला होता. पण उमेदवारी मिळाली नाही. यानंतर त्यांनी सेवेत परतण्यासाठी अर्ज केला. याला नितीशकुमार सरकारने ९ महिन्यांनंतर मंजुरी दिली. २००९ मध्ये पांडे यांनी व्हीआरएस घेतला तेव्हा ते आयजी होते आणि २०१९ मध्ये त्यांना बिहारचे डीजीपी केले गेले होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here