‌म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

ज्येष्ठ अभिनेत्री यांच्या निधनाचा नाट्य-चित्रपटसृष्टीसह रसिकांनाही मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीनंतर सोशल मीडियावर हतबलता, खंत, संताप व्यक्त होत आहे. एका संवेदनशील उत्कृष्ट कलाकाराचा असा करोनामुळे शेवट अनपेक्षित असल्याची भावनाही अनेकांनी मांडली. ज्येष्ठ कलाकारांनी खरोखरच एवढा धोका पत्करण्याची गरज आहे का, असाही प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे.

ज्येष्ठ नागरिकांना चित्रीकरणामध्ये मनाई केली होती. तरीही हट्टाने हा निर्णय बदलण्यास भाग पाडण्यात आले. हा हट्ट महाग पडत असल्याचे मत काहींनी सोशल मीडियावर मांडले. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने या पार्श्वभूमीवर मंगळवारी एक परिपत्रक काढले आहे. चित्रीकरणाच्या ठिकाणी कोविड-१९ चे नियम पाळले जात नसल्याचे यात नमूद केले आहे. कलाकार, तंत्रज्ञ, कामगार या व्यवसायावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांचा रोजगार चालू होऊन उपासमार थांबावी म्हणून चित्रीकरणासाठी परवानगी दिली आहे. मात्र, नियमांचे पालन होत नसल्याने निर्माते, कलावंत, तंत्रज्ञ, कामगार आणि इतर व्यावसायिकांना खबरदारीचा तसेच निर्वाणीचा इशारा देण्यात आल्याचे परिपत्रकात नमूद केले आहे. पुन्हा लॉकडाउन लागू झाला, तर सगळ्यांचेच पुन्हा हाल होतील, असाही इशाराही चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी दिला आहे.

ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त आशालता यांच्याविषयी बोलताना भावूक झाले. त्यांच्याशी जवळचे नाते होते. अतिशय हसरी, खेळकर व्यक्ती होती ती. तिने घाई का केली? अशा शब्दांमध्ये त्यांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. मात्र चित्रीकरण करणे योग्य की अयोग्य या संपूर्ण प्रकरणी कोणतेही भाष्य करणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

ज्येष्ठ लोककला अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांनी वृद्ध कलावंत, लोककला, चित्रपट, नाटक कलाकार यांच्यासाठी अतिदक्षता गरजेची असल्याचे स्पष्ट केले. सर्वच कलावंतांनी आपल्यावर बंधने घालणे गरजेचे आहे. त्यातही ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ कलावंत यांच्यासाठी हे संकट अधिक परिणाम करणारे आहे, हे मान्य करून सादरीकरणाचा मोह आवरता घेतला पाहिजे आणि त्यासाठी आत्मनियंत्रण गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

महामंडळाचे निर्देश

– जिल्हाधिकारी, पोलिसांच्या परवानगीशिवाय चित्रीकरण करू नये.

– लहान मुले, ज्येष्ठ कलावंतांची विशेष काळजी घ्यावी

– चित्रपट महामंडळाचे सर्व चित्रीकरणांवर भरारी पथकांच्या माध्यमातून बारकाईने लक्ष असणार आहे.

– नियमांचे उल्लंघन होताना दिसले, तर पोलिसांच्या मदतीने चित्रीकरण थांबवले जाईल

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here