म. टा. प्रतिनिधी, : पिंपरी-चिंचवड शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या वॉर्ड बॉय आणि सुरक्षा रक्षक महिलेने रेमडेसिवीर हे इंजेक्शन चढ्या दराने विकल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत.

मुस्तफा अब्दुल गफार तांबोळी यांनी याबाबत निगडी पोलिसांत तक्रार अर्ज दिला होता. त्याच्या चौकशीनंतर महिला सुरक्षा रक्षक वैष्णवी टाकुरकर, वॉर्ड बॉय शाहिद शेख आणि विजय रांजणे या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ निरीक्षक गणेश जवंदवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुस्तफा यांची आई मुमताज अब्दुल गफार तांबोळी यांना करोनाची बाधा झाल्याने येथील स्टार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. दरम्यान, उपचारासाठी आवश्यक असलेले रेमडेसिवीर इंजेक्शन डॉक्टरांनी आणण्यास सांगितले होते. अगोदर दोन इंजेक्शन मेडिकलमध्ये उपलब्ध झाली. त्यानंतर, मुमताज यांची प्रकृती खालावल्याने त्यांना डॉक्टरांनी आणखी इंजेक्शन आणण्यास सांगितले. मात्र, इंजेक्शनचा तुटवडा असल्याने ते उपलब्ध झाले नाही.

दरम्यान, मुस्तफा यांची आई दाखल असलेल्या आयसीयू वॉर्डातील वॉर्ड बॉय शाहिद शेख याच्याकडे इंजेक्शन कुठे मिळतील असे विचारले असता, इंजेक्शन्स मिळतील मात्र दोन इंजेक्शनसाठी १५ हजार ६०० रुपये मोजावे लागतील, असे सांगत इंजेक्शन आणून मुस्तफा यांना दिले. यावेळी डॉक्टरांनी दिलेली चिठ्ठी देखील त्याने फाडून टाकली असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. यातील तक्रारदाराच्या आईचा उपचारादरम्यान दोन दिवसांनी मृत्यू झाला. हा सर्व प्रकार ऑगस्ट महिन्याच्या १८ ते २४ तारखेदरम्यान घडला.

त्यानंतर, मुस्तफा यांच्या मित्राच्या वडिलांवर भोसरी येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. तेव्हा, देखील रेमडेसिवीर इंजेक्शन आवश्यक होते. मुस्तफा यांनी वॉर्ड बॉय शाहिद शेखला फोन करून इंजेक्शन मिळतील का? असे विचारल्यानंतर उपलब्ध होतील असे सांगत रुग्णालयाची सुरक्षा रक्षक महिला वैष्णवी टाकूरकर आणि वॉर्ड बॉय विजय रांजणे यांच्यासह भेटले. त्यानंतर मुस्तफा आणि इंजेक्शन हवे असलेले मित्र त्या ठिकाणी इंजेक्शन घेण्यासाठी गेले. तेव्हा, त्यांनी ६ हजार रुपयांना इंजेक्शन विकताना त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. यापैकी, विजय रांजणे हा पळून गेला. मात्र, पोलिसांनी या तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून चौकशी नंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार: डॉ. अमित वाघ

स्टार हॉस्पिटलचे संचालक डॉ. अमित वाघ यांनी सर्व आरोप फेटाळून लावले असून, हा प्रकार हॉस्पिटलमध्ये घडला नसल्याचे म्हटले आहे. तसेच, संबंधित वॉर्ड बॉय आणि सुरक्षा रक्षक महिलेला कामावरून काढून टाकले आहे. पोलिसांनी चौकशी करावी आणि या घटनेत दोषी असलेल्यांवर कारवाई करावी. या घटनेशी हॉस्पिटल आणि फार्मसीचा काहीही संबंध नाही. त्यामुळे जाणीवपूर्वक हॉस्पिटलची बदनामी करणाऱ्यांवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे डॉ. अमित वाघ यांनी सांगितले आहे.

आणखी बातम्या वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here