लांब पल्ल्यांचा रेल्वेतून प्रवास करताना खाद्यपदार्थांच्या सुमार दर्जाबाबत प्रवाशांच्या तक्रारींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. शताब्दी, तेजसनंतर आता जनशताब्दी एक्स्प्रेसमध्येही प्रवाशांना दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आठवड्याभरातच तीन प्रमुख एक्स्प्रेसमध्ये दूषित खाद्यपदार्थांबाबत प्रवाशांनी तक्रार दाखल केली. यामुळे इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) नियुक्त केलेल्या कंत्राटदारांच्या सेवेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
शनिवारी १७ जणांच्या गटाने ठाणे स्थानकातून चिपळूणला जाण्यासाठी पकडली. यापैकी काहीजणांचे आसन डी-५ या डब्यात असल्याने त्यांनी त्या डब्यातून प्रवास सुरू केला. रात्री सव्वाआठच्या सुमारास त्यांनी ‘ब्रेड-कटलेट’ मागवले. त्यातील ब्रेडमध्ये बुरशी लागल्याचे आढळल्यामुळे संबंधित कर्मचारी पुन्हा डब्यात आल्यानंतर त्यांनी हा प्रकार त्याच्या निदर्शनास आणून दिला. या कर्मचाऱ्याने ब्रेड-कटलेट बदलून देण्याची तयारी दर्शवली. मात्र बुरशीयुक्त ब्रेड पाहिल्यामुळे पुन्हा ब्रेड खाण्याची इच्छा झाली नाही,’ असे जनशताब्दी एक्स्प्रेसमधील मधुमिता बाल यांनी सांगितले.
ब्रेड-कटलेट मागवण्याआधी पोहे आणि उपमा मागवला होता. मात्र त्याचा दर्जा चांगला नसल्याने ब्रेड कटलेट मागवले. सोमवारी सकाळी या प्रकरणी आयआरसीटीसीमध्ये तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्यांनी फोन करून घडलेली हकीकत जाणून घेतली. दोषी कंत्राटदार आणि सेवा पुरवणाऱ्यावर गंभीर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिल्याचे प्रवासी बाल यांनी स्पष्ट केले.
आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्यांकडून याबाबत माहिती घेतली असता, मुदत संपलेले ब्रेड वापरल्यामुळे बुरशी लागल्याची शक्यता आहे. या प्रकरणी संबंधित ठेकेदाराला एक लाखांचा दंड बजावण्यात आला असून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
पंधरा दिवसांत तीन तक्रारी
दूषित खाद्यपदार्थांबाबत तक्रार सर्वप्रथम शताब्दी एक्स्प्रेसमधील प्रवाशांनी केली होती. या एक्स्प्रेसमधील प्रवाशांना बुरशीयुक्त ब्रेड देण्यात आले. त्यानंतर शनिवारी करमाळी-मुंबई तेजस एक्स्प्रेसमधील प्रवाशांनी खराब भाजी दिल्यामुळे तक्रार दाखल केली होती.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times