आबुधाबी : मुंबई इंडियन्ससाठी आजचा विजय अविस्मरणीय असाच असेल. कारण हा त्यांचा या स्पर्धेतील पहिला विजय तर ठरलाच, पण युएईमधीलही त्यांचा हा पहिलायच विजय आहे. युएईमधील गेल्या सहा सामन्यांमध्ये मुंबईला एकही विजय मिळवता आला नव्हता. या विजयासह मुंबईने स्पर्धेतील आपले खाते उघडले आहे. रोहित शर्माची धडाकेबाज ८० धावांची खेळी आणि मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे त्यांना केकेआरवर आज विजय साकारता आला.

मुंबईच्या १९६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरने सावध सुरुवात केली. केकेआरला शुभमन गिलच्या रुपात पहिलाच धक्का लवकर बसला. त्यानंतर दुसरा सलामीवीर सुनील नरिनही झटपट बाद झाला. त्यामुळे कर्णधार दिनेश कार्तिक आणि नितिश राणा यांनी आपल्या खेळीला सावधपणे सुरुवात केली. स्थिरस्थावर झाल्यावर हे दोघे मोठी फटकेबाजी करतील, असे वाटत होते. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ४६ धावांची भागीदारी रचली. पण या दोघांना संघाची धावगती वाढवता आली नाही. दिनेश कार्तिकला यावेळी ३० धावा करता आल्या, तर राणाने २४ धावा केल्या.

राणा आणि कार्तिक बाद झाल्यावर आंद्रे रसेल आणि इऑन मॉर्गन हे दोन ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील दोन फलंदाज खेळपट्टीवर होते. या दोघांनीही स्थिरस्थावर व्हायला थोडा वेळ घेतला. पण मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने या दोघांनाही एकाच षटकात बाद केले आणि त्यानंतर केकेआरच्या विजयाच्या आशा मावळल्या.

केकेआरने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. केकेआरची सुरुवात चांगली झाली कारण त्यांनी सलामीवीर क्टिंटन डीकॉकला लवकर बाद केले. केकेआरचा युवा वेगवान गोलंदाज शिवम मावीने यावेळी संघाला दुसऱ्या षटकात पहिले यश मिळवून दिले. पण त्यानंतर मात्र मुंबईच्या फलंदाजांनीच मैदान चांगले गाजवल्याचे पाहायला मिळाले.

डीकॉक बाद झाल्यावर फलंदाजीला आलेल्या सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा यांनी दमदार फलंदाजी केली. रोहित आणि सूर्यकुमार यांनी दुसऱ्या विकेटसाठी ९० धावांची भागीदारी रचली. त्यामुळेच मुंबईला आपल्या धावसंख्येचा चांगला पाया रचला आहे. सूर्यकुमार धावचीत झाला आणि ही जोडी फुटली. सूर्यकुमारने २८ चेंडूंत सहा चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ४७ धावांची खेळी साकारली.

सूर्यकुमार बाद झाला असला तरी रोहित मात्र चांगलाच स्थिरस्थावर झाला होता. त्यामुळे रोहितने यावेळी संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आण अर्धशतकही झळकावले. रोहितने केकेआरच्या गोलंदाजांचा यावेळी चांगलाच समाचार घेतल्याचे पाहायला मिळाले. कारण रोहितपुढे केकेआरच्या गोलंदाजांचे काहीही चालत नव्हते. रोहितने यावेळी ५४ चेडूंत चीन चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर ८० धावांची खेळी साकारली. रोहित यावेळी शतक झळकावेल, असे चाहत्यांना वाटत होते, पण त्याचे शतक या सामन्यात हुकले. रोहित शर्मा बाद झाल्यावर हार्दिक पंड्याही लगेच बाद झाला. त्यामुळे मुंबईला अखेरच्या षटकांमध्ये मोठी फटकेबाजी करता आली नाही. मुंबईला या सामन्यात २०० धावांचा पल्ला गाठायची संधी होती, पण त्यांना या संधीचे सोने करता आले नाही.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here