गुरुबाळ माळी, कोल्हापूरः करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मृतांचा आकडा रोज वाढू लागला, अंत्यसंस्कारासाठी शेणी कमी पडू लागल्या , तेव्हा महापालिकेने जनतेच्या दातृत्वाला आवाहन केले. त्याला प्रतिसाद देताना कोल्हापूरकरांच्या दातृत्वाला महापूर आला. वीस दिवसात तब्बल साडेसहा लाख शेणी दान करत कोल्हापूरकर देताना कधी हात आखडते घेत नाही हे दाखवून दिले.

कोल्हापूर महापालिकेच्या वतीने मोफत अंत्यसंस्कार केले जातात. दरवर्षी चार हजारावर मृतदेहावर होणाऱ्या या अंत्यसंस्कारासाठी महापालिकेला किमान एक कोटी रुपये खर्च येतो. मोफत होणाऱ्या या अंत्यसंस्कारामुळे ‘जगावे कुठेही, पण मरावे कोल्हापुरात’ अशी म्हण तयार झाली आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर मृतांचा आकडा रोज वाढू लागला. यामुळे अंत्यसंस्कारासाठी लागणाऱ्या वस्तूंचा तुटवडा भासू लागल्याने महापालिकेच्या नियोजित अंत्यसंस्काराचे गणित बिघडले. दरवर्षी अंत्यसंस्कारासाठी साधारणता 25 लाख शेणी लागतात. दरमहा साधारणता तीनशे मृतदेहावर यातून अंत्यसंस्कार केले जातात. गेल्या चार महिन्यात करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अंत्यसंस्काराचे प्रमाण प्रचंड वाढले. ऑगस्ट महिन्यात तर तब्बल चौदाशे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. जून आणि जुलै महिन्यात हा आकडा एक हजार पर्यंत होता. जो पूर्वी साधारणता दरमहा तीनशेपर्यंत असायचा.

अचानक अंत्यसंस्कारराचे प्रमाण वाढल्याने शेणी आणि लाकूड दोन्ही कमी पडू लागले. अशावेळी महापालिकेने जनतेला आवाहन करत मदत करण्याची विनंती केली. महापौर निलोफर आजरेकर आणि आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केलेल्या या आवाहनाला कोल्हापूरकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. केवळ वीस दिवसात साडेसहा लाख शेणी महापालिकेच्या स्मशानभूमीत जमा झाल्या. केवळ कोल्हापूरच नव्हे तर परदेशातूनही मदतीचा हात पुढे आला. कोल्हापूरचा एक युवक अमेरिकेत इंजिनियर आहे, त्याला ही बातमी कळताच त्यानेही 50 हजार शेणी दान दिले. या काळात मृत झालेल्या अनेकांच्या नातेवाईकांनीही शेणी दान दिले.

कोल्हापुरातील अनेक तरुण मंडळे या चळवळीत पुढे आले आहेत. कोल्हापूरकरांनी मनावर घेतलं तर काय करू शकतात याचे हे उदाहरण. साडे सहा लाख शेणी जमा झाल्याने आता पुढील अंत्यसंस्कारासाठी लागणाऱ्या शेणीचा प्रश्न मिटला असून अनेकांनी लाकूडही दान केल्याने अंत्यसंस्काराची चिंता मिटली आहे.

अंत्यसंस्कारासाठी यंदा शेणी कमी पडल्याने आम्ही जनतेला आवाहन केले, त्याला जनतेने भरभरून प्रतिसाद दिला, त्यामुळे आता शेणी नको, रोख रक्कम द्या , त्यातून अन्य काही तरी कामे करता येतील असे नवीन आवाहन केले आहे.
डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, आयुक्त

कोल्हापूरकरांचे दातृत्व सर्वत्र प्रसिद्ध आहे, केवळ एका आवाहनाला प्रतिसाद देत ज्या आत्मीयतेने कोल्हापूरकरांनी शेणी दान करतानाच मोफत अंत्यसंस्कार उपक्रमासाठी रोख रक्कमही दिली. यातून आता स्मशानभूमीचे चित्र पालटले जाईल.
– निलोफर आजरेकर, महापौर

दरमहा सरासरी अंत्यसंस्कार – ३००

करोना काळात वाढलेले अंत्यसंस्कार – १४००

एका अंत्यसंस्काराला लागणाऱ्या शेणीव – ५०० ते ६००

एका अंत्यसंस्काराचा खर्च – २००० रुपये

वर्षाला लागणाऱ्या शेणी – २५ लाख नग

स्मशानभूमीत काम करणारे कर्मचारी – २५

महापालिकेचा अंत्यसंस्काराचा वार्षिक खर्च – एक कोटी

कोल्हापुरातील स्मशानभूमी – ४

गॅसदाहिनीत रोज होणारे अंत्यसंस्कार – १०

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here