जुना जरीपटका बसस्थानक परिसरात श्रेयस संजय पाटील (वय २४ रा. ज्ञानेश्वर सोसायटी, मानकापूर) यांच्या मालकीचे रॉयल बार अॅण्ड रेस्टॉरेंट आहे. मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास श्रेयस पाटील यांचे वडील संजय पाटील, कर्मचारी गजानन मलिक रा. लुंबिनीनगर, किशोर उपाध्याय रा. राणी दुर्गावती चौक व गिरीश उपाध्याय रा. राणी दुर्गावती चौक हे बारमध्ये होते. याचवेळी सहा जण हातात तलवार व शस्त्र घेऊन बारमध्ये घुसले. पाटील व कर्मचाऱ्यांना तलवारीचा धाक दाखवून ठार मारण्याची धमकी दिली. बारमधील साहित्याची तोडफोड करून काऊंटरमधील सात हजार रुपये लुटले व पसार झाले. या संपूर्ण घटनेची चित्रफित समाजमाध्यमांवर व्हायरल झाली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक खुशाल तिजारे यांच्यासह पोलिसांचा ताफा बारमध्ये पोहोचला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. एक आठवड्यापूर्वी लुटारु हे बारमध्ये गेले होते. यावेळी त्यांनी बारमध्ये बसून दारु प्यायला लागले. मालकाने नकार दिला. लुटारुंनी त्यांच्यासोबत वाद घातला. त्यानंतर बारमालकाला अद्दल घडविण्यासाठी लुटपाट करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. अटक व ताब्यात घेण्यात आलेले सर्व गुन्हेगार आहेत. त्यांच्याविरुद्ध खापरखेडा व यशोधरानगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत.
खापरखेड्यातून घेतले ताब्यात
बारमध्ये लुटपाट केल्यानंतर लुटारु खापरखेडा येथे गेले. या भागात अर्धनग्न होऊन लुटारु दरोड्याच्या तयारीत होते. याची माहिती मिळताच जरीपटका पोलिसांचे पथक तेथे गेले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने लुटारुंना ताब्यात घेतले. त्यांना घेऊन पोलिस जरीपटक्याकडे येत होते. यशोधरानगर परिसरात आरोपींना घेऊन येणारे वाहन पंक्चर झाले. आरोपी पसार होण्याची शक्यता असल्याने त्यांना तसेच पायी जरीपटका पोलिस स्टेशननमध्ये आणण्यात आले,असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. मात्र नागरिकांचा यावर विश्वास नाही.
गुन्हेगाराची चौथी धिंड
गुन्हेगारांचा धाक कमी करण्यासह नागरिकांमध्ये पोलिसांप्रतीविश्वास वाढावा यासाठी नागपूर पोलिसांकडे गुन्हेगारांची धिंड काढण्यात येत आहे. सुमारे एक वर्षापूर्वी गुन्हेशाखेचे उपायुक्त गजानन राजमाने यांनी गँगस्टर संतोष आबेकर याची आकावणी चौक ते जिल्हा न्यायालयापर्यंत पायी धिंड काढली होती. त्यानंतर पोलिस उपायुक्त राहुल माकणीकर यांनी वाहनांची तोडफोडकरणाऱ्या दोन टोळींची सेंट्रल एव्हेन्यूवरील बजेरिया भागात धिंड काढली होती. आता जरीपटका पोलिसांनी लुटारुंची अर्धनग्नअवस्थेत धिंड काढली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times