पुणेः पुण्यातील जंबो कोव्हिड सेंटरमधील गोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. ३३ वर्षीय करोना पॉझिटिव्ह तरुणी कोव्हिड सेंटरमधून बेपत्ता झाल्यानं एकच खळबळ माजली आहे.

बेपत्ता झालेल्या तरुणीला ससून रुग्णालयातून कोव्हिड सेंटरमध्ये दाखल केले होते. या रुग्ण महिलेवर उपचार सुरु असल्याचं कोव्हिड सेंटरमधून सुरूवातीला सांगण्यात आलं होतं. मात्र, बरी झालेल्या आपल्या तरुणीला जंबो कोव्हिड सेंटरमधून घरी घेऊन जाण्यासाठी गेलेल्या तिच्या आईला, ‘तुमची मुलगी येथे अॅडमिटच नव्हती’, अशी धक्कादायक माहिती देण्यात आली. त्यानंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाविरोधात आमरण उपोषणाचा मार्ग निवडला आहे.

जंबो कोविड सेंटर येथून बेपत्ता झालेल्या ३३ वर्षीय तरुणीचा घातपात झाला असण्याची शक्यता व्यक्त करत बेपत्ता तरुणीच्या आईनं जंबो कोव्हिड सेंटर येथे आमरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे.

माझी मुलगी परत मिळाल्याशिवाय मी हे उपोषण सोडणार नाही. माझी मुलगी मला जिवंतच मिळाली पाहिजे. ससून रूग्णालयातून रुग्णवाहिकेतून कोव्हिड सेंटरमध्ये माझी मुलगी दाखल झाली होती. दरम्यानच्या काळात तिच्यावर उपचार सुरू असल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आले. आता मुलीला घरी परत नेण्याची वेळ आली तेव्हा ती कोविड सेंटरमध्ये नसल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात संबंधित सर्व यंत्रणा हात वर करून मोकळ्या झाल्या आहेत. मला माझी मुलगी पाहिजे आहे आणि मला न्याय पाहिजे आहे. अशी संतप्त प्रतिक्रिया बेपत्ता तरुणीच्या आईनं व्यक्त केली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here