मुंबई : व्हीडिओकॉन समूहाच्या कर्ज प्रकरणी दोषी आढललेल्या तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या विरोधात आयसीआयसीआय बॅंकेने कठोर भूमिका घेतली आहे. एप्रिल २००६ ते मार्च २०१८ या कालावधीत कोचर यांनी घेतलेली वेतनवाढ, शेअर्स, बोनससह १२ कोटी परत मिळवण्यासाठी ICICI बॅंकेने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आपल्या कार्यकाळात कर्जदारांकडून कर्ज वसुलीचे आदेश देणाऱ्या कोचर यांच्यावर ही नामुष्की ओढवल्याने बॅंकिंग क्षेत्रात चर्चेचा विषय ठरला आहे.

प्रशिक्षणार्थी कर्मचारी ते बॅंकेच्या प्रमुख असा चंदा कोचर यांचा आयसीआयसीआय बॅंकेमधील प्रवास राहिला आहे. बॅंकेच्या पहिल्या महिला मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून चंदा कोचर यांचा बॅंकिंग क्षेत्रात दबदबा होता. कोचर या जोधपूरच्या असून त्यांनी १९८४ मध्ये आयसीआयसीआय बॅंकेत प्रशिक्षणार्थी कर्मचारी म्हणून प्रवेश केला. २०११ मध्ये त्यांना पद्‌मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. फोर्ब्स आणि फॉर्च्युन सारख्या मासिकांनी जगातील सर्वात प्रभावी १०० महिलांमध्ये कोचर यांना स्थान दिले. सलग आठ वर्षे त्यांचा ३० सर्वात प्रतिभाशाली महिलांच्या यादीत समावेश होता. कोर्पोरेट्समध्ये करियर करू इच्छिणाऱ्या महिलांच्या त्या आयकॉन बनल्या होत्या. त्यांची कारकीर्द एखाद्या सिनेमाच्या कथानकाला शोभेल अशीच राहिली. प्रसिद्धीच्या शिखरावरून अशा प्रकारे आपलं करियर संपुष्टात येईल, असा विचात कोचर यांच्या मनात आला नसेल.मात्र व्हीडिओकॉन कर्ज प्रकरणाने कोचर यांच्या प्रतिमेला डाग लागला.

नुकताच ‘ईडी’ने कोचर यांचा मुंबईतील फ्लॅट आणि पती दीपक कोचर यांची काही संपत्ती जप्त केली आहे. जप्त केलेल्या संपत्तीचे मूल्य ७८ कोटी रुपये असल्याचे वृत्त आहे. चंदा कोचर यांच्या विरोधात ही कारवाई २०१२ मध्ये आयसीआयसीआय बँकेकडून व्हिडिओकॉन समूहाला देण्यात आलेल्या ३२५० कोटी रुपये कर्जाच्या संदर्भात करण्यात आली होती. आयसीआयसीआय बॅंकेने कोचर यांना बडतर्फ केले होते. परिणामी एप्रिल २००६ ते मार्च २०१८ या कालावधीत कोचर यांनी घेतलेली वेतनवाढ, शेअर्स, बोनससह इतर लाभ असे १२ कोटी बॅंकेला परत घेण्याचा अधिकार आहे. कोचर यांच्या भूमिकेमुळे बँकेची प्रतिमा मलीन झाली. शेअर बाजारात समभागधारकांचे मोठे नुकसान झाले असे बँकेने न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. व्हीडिओकॉन कर्ज प्रकरणी चौकशीसाठी बॅंकेने कोचर यांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते. कोचर यांनी ऑक्‍टोबर २०१८ मध्ये राजीनामा दिला होता.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here