म. टा. प्रतिनिधी, : दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ केली जात असल्याच्या संशयावरून अन्न व औषध प्रशासनाने मिरज तालुक्यातील एरंडोली येथे छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत सूर्यप्रकाश दूध संकलन केंद्र आणि पाटील मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स या दोन ठिकाणांवरून ४ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दुधात भेसळ केल्याच्या संशयावरून दीड हजार लिटर दूध ओतून नष्ट करण्यात आले असून, जप्त केलेल्या पदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत.

विभागाकडून गेल्या आठवडाभरापासून सांगली जिल्ह्यात भेसळखोरांच्या विरोधात मोहीम सुरू आहे. गेल्या आठवड्यात खाद्यतेल व डाळ विक्रेत्यांवर कारवाई केल्यानंतर या आठवड्यात दूध व दुग्धजन्य पदार्थांची तपासणी सुरू केली आहे. मिरज तालुक्यातील एरंडोली येथे बुधवारी सायंकाळी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने छापा टाकला. सूर्यप्रकाश दूध संकलन केंद्र आणि पाटील मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स या दोन ठिकाणांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान पाटील मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्समध्ये दुधात भेसळ करून दुग्धजन्य पदार्थ तयार करीत असल्याचा संशय अधिकाऱ्यांना आला. गाय आणि म्हशीच्या दुधात भेसळीसाठी वापरल्या जाणाऱ्या दूध पावडरसह ट्राय सोडियम साइट्रेटचा साठाही पथकाच्या हाती लागला.

तपासणी पथकाने एक हजार लिटर म्हशीचे दूध, ५१५ लिटर गाईचे दूध, २१२३ किलोग्राम दूध पावडर, तर ३० किलोग्राम ट्रायसोडियम सायट्रेट असा ४ लाख १६ हजार १७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याशिवाय दूध, खवा, पनीर, तूप असे इतर दुग्धजन्य पदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. अहवाल येताच पुढील कारवाई केली जाणार आहे. सूर्यप्रकाश दूध संकलन केंद्रात गाय व म्हशीचे दूध संकलित केले जाते. दुधाचे नमुने तपासणीसाठी पाठवल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त एस. ए. चौगुले यांनी दिली.

आणखी बातम्या वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here