माजी मंत्री पंडितराव दौंड यांचे सुपुत्र संजय दौंड हे विधानपरिषदेच्या उर्वरित कार्यकाळासाठी नशिब आजमावणार आहेत. दौंड आणि पवार कुटुंबीयांचे जवळचे संबंध आहेत. विधानसभा निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संजय दौंड यांना शब्द दिला होता. त्यानुसार दौंड यांची परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला मदत झाली. यानंतर धनंजय मुंडे निवडूनही आले. आता धनंजय मुंडेंच्या जागेवर राष्ट्रवादीने दौंड यांनाच संधी दिली आहे.
परळी मतदारसंघात दौंड कुटुंबाचा चांगला जनसंपर्क आहे. २०१४ च्या निवडणुकीत शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी स्वबळावर निवडणूक लढवली होती. तेव्हाही संजय दौंड हे काँग्रेसकडून इच्छुक होते. याशिवाय संजय दौंड यांनी अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलं आहे.
भाजपकडून राजन तेली यांना उमेदवारी
धनंजय मुंडे यांचा विधानपरिषदेतील कार्यकाळ ७ जुलै २०२२ पर्यंत होता. पण ते विधानसभेवर निवडून गेल्यामुळे ही जागा रिक्त झाली. या जागेसाठी पोटनिवडणूक लागल्यानंतर भाजपने राजन तेली, तर राष्ट्रवादीने संजय दौंड यांना उमेदवारी दिली आहे. भाजपसमोर महाविकास आघाडीतील तीन पक्षांचं आव्हान असेल. दरम्यान, विधानसभेतील पक्षीय बलाबल पाहता या जागेवर महाविकास आघाडीचा मार्ग सुकर दिसतो.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times