चंदीगड: केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर हरसिमरत कौर बादल आणि त्यांचा पक्ष आक्रमक झाले आहेत. केंद्रातील मोदी सरकारने आणलेल्या कृषी विधेयकांच्या मुद्यावरून शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. यावरून अकाली दल आता शेतकऱ्यांसाठी मोठी लढाई लढण्याच्या मनस्थितीत आहे. अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनी कृषी विधेयकांवरून गुरुवारी केंद्र सरकारला इशारा दिला. ‘आम्ही आधी हात जोडत होतो, पण आता आपण दिल्ली हदारवू’, असं हरसिमरत कौर म्हणाल्या…

पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांमध्ये कृषी विधेयकाविरोधात असंतोष आहे. या पार्श्वभूमीवर हरसिमरत कौर बादल यांनी हा इशारा दिला आहे. हरसिमरत कौर बादल या आपल्या शेकडो समर्थकांसह दमदमा साहिबमध्ये दाखल झाल्या. इथे आपल्या समर्थकांना आणि शेतकर्‍यांना त्यांनी संबोधित केलं. केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांना आमचा विरोध आहे आणि आता त्यांचा अकाली दल या लढ्यात शेतकऱ्यांसोबत आहे, असं त्या म्हणाल्या.

हरसिमरत कौर बादल यांचा कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा

शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनी कृषी विधेयकांना विरोध कर केंद्र सरकारच्या कॅबिनेट मंत्री पदाचा नुकताच राजीनामा दिला होता. अकाली दलाने केंद्राच्या कृषी विधेयकांविरोधात मतदान करत संसदेपासून ते रस्त्यापर्यंत या विरोधात उतरण्याचा इशारा दिला होता. केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर बादल मोदी सरकारमधील अकाली दलाच्या एकमेव प्रतिनिधी होत्या.

केंद्राने दुर्लक्ष केल्याचा आरोप

आम्ही कृषी विधेयकांचा निषेध करूनही केंद्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि आमचं ऐकलं नाही, असा आरोप हरसिमरत कौर बादल यांनी केला. यापूर्वी लोकसभेत अकाली दलाचे प्रमुख सुखबीर बादल यांनी या विधेयकाविरोधात इशारा दिला होता. सरकारने मागे घेतली नाही तर हरसिमरत कौर बादल या केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देतील, असा इशारा त्यांनी दिला होता.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here