म. टा. विशेष: शहरांमधील कुटुंबाचा आकार चौकोनापासून त्रिकोणापर्यंत आला आहे. पण खेड्यापाड्यांमध्ये अंधश्रद्धा, आरोग्य साधनांच्या अभावाने आधी दोन अपत्ये असलेल्या ६७ टक्के स्त्रियांना इच्छा नसतानाही पुन्हा गर्भधारणा होते. लोकसंख्या वाढीची ही साखळी इथेच थांबत नाही. तर नसबंदी करून घेणाऱ्यांमध्येही महिलेचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत ०.२ टक्क्यांनी कमीच आढळले आहे. हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे केंद्र सरकारच्याच राष्ट्रीय कुटुंब पाहणीतून. यातील सर्वांत चिंतेची बाब म्हणजे पुरोगामी म्हणवून घेणारा आपला महाराष्ट्र यातही पहिल्या १० राज्यांच्या पंक्तीतही पुढे आहे.

कोव्हिड -१९ या विषाणू प्रादुर्भावाच्या धर्तीवर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे डिसेंबरनंतर देशात पुन्हा एकदा लोकसंख्या वाढिचा विस्फोट होण्याची भिती यापूर्वीच व्यक्त झाली आहे. त्यात नको असलेल्या गर्भधारणेला प्रतिबंध करण्यासाठी २६ सप्टेंबर हा दिवस जगभर संततिप्रतिबंधक दिन म्हणून पाळला जातो. त्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा प्रकाशात आलेला हा निष्कर्ष नव्या चिंतेत भर घालणारा ठरत आहे.

केंद्र सरकारच्याच राष्ट्रीय कुटुंब पाहणीने केलेल्या अभ्यासानुसार नसबंदी करून घेणाऱ्या पुरुषांचे प्रमाण केवळ २.५ टक्के आहे. यातील महिलांचा टक्का २.३ टक्के आहे. नसबंदी करून कुटुंब नियोजन करणाऱ्या जोडप्यांपैकी जेमतेम १ टक्के जोडप्यांनी कधी ना कधी तातडीक संततीप्रतिबंधक गोळी (ईसीपी) वापरलेली होती. गरोदर स्त्रियांपैकी ७४ टक्के जणींनीच रक्तदाब मोजला होता. फक्त ३४ टक्के स्त्रियांना गरोदरपणाची पूर्ण तपासणी तर ४६ टक्के गरोदर स्त्रियांना रक्तवर्धक लोह गोळया मिळाल्या.

गर्भपात इच्छुकांमध्ये ३० टक्के किशोरवयीन मुली

फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया व बायर स्किरिंग फार्मा यांनी देखील असाच एक स्वतंत्र अभ्यास देशपातळीवर केला होता. त्यानुसार गर्भपात इच्छुकांमध्ये २७ ते ३० टक्के किशोरवयीन मुली असतात. जगभरात दरवर्षी सुमारे ४.२ कोटी स्त्रिया नको असताना गर्भधारणा झाल्याने गर्भपात करतात. देशाच्या लोकसंख्येत २५ वर्षांहून कमी वयाच्या तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. यापैकी कित्येक तरुणांना लैंगिक ज्ञान तसेच गर्भधारणेबद्दल अत्यल्प माहिती असते किंवा अजिबातच माहिती नसते; त्यामुळे नको असलेल्या गर्भधारणेचे प्रमाण वाढत आहे. गर्भनिरोधक साधनांचा वापर न केल्यामुळे दरवर्षी ५.१ कोटी स्त्रीया अकाली गर्भधारणा करून घेतात. अन्य २.५ कोटी गर्भधारणा गर्भनिरोधक साधनांचा अनियमित आणि अयोग्य वापर केल्यामुळे होतात. देशात दरवर्षी ६० लाख गर्भपात केले जातात. त्यापैकी२० लाख गर्भपात हे नैसर्गिक कारणांमुळे झालेले असतात; तर ४० लाख गर्भपात औषधे देऊन किंवा शस्त्रक्रिया करून करविले जातात.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here