म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘ऑक्सिजनवर असणाऱ्या रुग्णांनाच द्या. विनाकारण नातेवाइकांकडून इंजेक्शन मागवून तुटवडा निर्माण करू नका,’ अशा शब्दांत शहरातील सर्व रुग्णालयांना अन्न व औषध प्रशासनाने () तंबी दिली आहे. करोनावरील उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळा बाजार सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर ‘एफडीए’ने ही तंबी देण्यात आली आहे.

वापरलेल्या इंजेक्शनचे रेकॉर्ड ठेवणे रुग्णालयांना बंधनकारक करण्यात आले आहे. त्याशिवाय रुग्णालयातील वॉर्ड बॉय, नर्सकडून इंजेक्शनसाठी होणाऱ्या पैशांच्या मागणीची गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे.

शहरात गेल्या काही दिवसांपासून करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर रेमडेसिव्हिर, टोसिलीझूमॅब या इंजेक्शनची मागणी वाढली आहे. औषध कंपन्यांकडून होणाऱ्या पुरवठ्यातील त्रुटींमुळे पुण्यात तुटवडा निर्माण होऊ काळा बाजार सुरू झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘एफडीए’च्या पुणे विभागाने हालचाली करून औषध कंपन्यांना पुण्यात इंजेक्शनचा पुरवठा देण्यास सांगितले. बुधवारी रात्री उशिरा पुरवठा सुरू झाला आहे.

‘केंद्र सरकारने करोनाच्या रुग्णांना दिलेल्या उपचारांच्या प्रोटोकॉलनुसारच उपचार देताना रेमडेसिव्हिरचा वापर करावा. रेमडेसिव्हिरचे इंजेक्शन केवळ ऑक्सिजनवरील रुग्णांना देण्याच्या केंद्र सरकारच्या सूचना आहेत. त्या सूचना राज्याच्या आरोग्य विभागाने दिल्या आहेत. रुग्णालयात रुग्ण दाखल झाल्यानंतर केंद्र सरकारने प्रोटोकॉलनुसार पूर्ण तपासणी किंवा आवश्यक चाचण्या करूनच रुग्णाची स्थिती पाहूनच रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा वापर करणे आवश्यक आहे,’ अशा शब्दांत रुग्णालयांना ‘एफडीए’ने तंबी दिली आहे.

इंजेक्शनच्या वाढत्या मागणीमुळे रुग्णांच्या नातेवाइकांची धावपळ होत आहे. काही रुग्णालयातील वॉर्ड बॉय, नर्सिंग स्टाफ रुग्णांच्या नातेवाइकांकडून इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी जास्तीचे पैसे मागत आहेत. ही बाब गंभीर आहे, असे ‘एफडीए’चे सहआयुक्त एस. बी. पाटील यांनी रुग्णालयांना पाठविण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे. ‘रेमडेसिव्हिरचे इंजेक्शन वापराबाबत रुग्णालयांना ‘एफडीए’ने सूचना केल्या आहेत. त्या सूचनांचा पालन न केल्यास, तसेच रुग्णालयात गैरप्रकार आढळल्यास त्यासाठी रुग्णालय व्यवस्थापनाला जबाबदार धरण्यात येईल,’ असा इशाराही पाटील यांनी दिला आहे.

‘एफडीए’च्या सूचना…

– केंद्र सरकारच्या क्लिनिकल मॅनेजमेंट प्रोटोकॉलचे पालन करावे.

– रेमडेसिव्हिरची गरज लक्षात घेऊनच खरेदी करावी, साठा करून ठेवू नये.

– इंजेक्शन वापराबाबत रजिस्टर तयार करावे. त्यात रुग्णाचे नाव, पत्ता, वापरलेली संख्या व आकारलेली किंमत यांचा उल्लेख करावा.

– इंजेक्शनचा पूर्ण डोस देण्यात आला नाही, तर त्याचा उर्वरित साठा रुग्णालय फार्मसी किंवा रुग्णांच्या नातेवाइकांना परत करावा.

– करोना वॉर्डात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवावे. रुग्णालायात गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घ्यावी.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here