सोलापूर: सोलापूर शिवसेनेमधील गटबाजी चर्चेत असताना आता आणखी एक नवा वाद समोर आला आहे. शिवसेनेचे नवे जिल्हाप्रमुख असलेले पुरुषोत्तम बरडे यांच्या स्वागतासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत नोटांची उधळण करण्यात आली आहे. या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे शिवसेना विरोधकांच्या रडारवर आली आहे.

मंत्रीपद न मिळाल्यामुळे शिवसेनेचे उपनेते व सोलापूर संपर्कप्रमुख तानाजी सावंत नाराज होते. नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत तानाजी सावंत यांनी भाजपसोबत जात शिवसेनेविरोधात भूमिका घेतल्याचे समोर आले. त्यामुळे तानाजी सावंत आणि त्यांच्या समर्थकांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत होती. सोलापूरचे जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांना पदावरून दूर करत पुरुषोत्तम बरडे यांची नेमणूक प्रभारी जिल्हाप्रमुखपदावर करण्यात आली.

प्रभारी जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती झाल्यानंतर सोलापुरात आयोजित स्वागत मिरवणुकीत शिवसैनिकांनी नोटांची उधळण केली. या प्रकाराची सोलापूरमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. नोटांची उधळण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दरम्यान, बरडे यांनी आपल्या स्वागत मिरवणुकीत नोटांची उधळण झाली असल्याचा इन्कार केला. नोटांची उधळण होताना आपण स्वतः पाहिले नाही. आमचे शिवसैनिक नोटांची उधळण करणारे नसल्याचे त्यांनी म्हटले. तरीही कोणी नोटांची उधळण केली असेल तर हा आपल्या बदनामीचे षडयंत्र असू शकते, असेही बरडे यांनी म्हटले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here