युसाका हे ४४ वर्षांचे आहेत. यापूर्वीही फॅशन रिटेल जोजो इन्क सॉफ्टबँक ग्रुपला विकल्यानंतर ते चर्चेत आले होते. त्यांच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, युसाका २० वर्षांपेक्षा जास्त वय असलेली सिंगल मुलगी ते शोधत आहेत. वेबसाइटवर ते म्हणतात, ‘माझ्यात एकटेपणा वाढत आहे. मी एकाच गोष्टीचा विचार करतो आणि ते म्हणजे एका महिलेवर प्रेम करणं.’
गर्लफ्रेंडच्या रुपाने आपल्याला आयुष्याची साथीदार हवी असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. अंतराळातून आपलं प्रेम आणि जागतिक शांततेसाठी आवाहन करण्याची त्यांची इच्छा आहे.
अमेरिकन अब्जाधीश एलन मस्क यांच्या स्पेसएक्ट रॉकेटच्या माध्यमातून चंद्रावर जाणारे युसाका हे पहिलेच प्रवासी असतील. २०२२ मध्ये ते चंद्रावर जाऊ शकतात. नुकतंच त्यांचं २७ वर्षीय अभिनेत्री आणि गर्लफ्रेंड अयमे गोरिकीसोबत ब्रेकअप झालं आहे. युसाका यांचा नवीन गर्लफ्रेंड शोधण्याचा कार्यक्रम एबेमा टीव्हीमध्येही दाखवण्यात येणार आहे.
टीव्हीवर येणाऱ्या कार्यक्रमाचं नाव फुल मून लव्हर्स असं असेल. तर युसाका यांची गर्लफ्रेंड होण्यासाठी अर्ज करताना मुलीला अंतराळात जाण्यात रुची असणं गरजेचं आहे. सोबतच चंद्रावर जाण्याची तयारी करण्यातही गर्लफ्रेंडला सहभाग घ्यावा लागेल. मुलीचे विचार जागतिक शांततेच्या बाजूने असावेत ही एक अट आहे.
युसाकाची गर्लफ्रेंड होण्यासाठी मुली १७ जानेवारीपर्यंत अर्ज करू शकतात. मार्च अखेरपर्यंत ते गर्लफ्रेंडचं नाव निश्चित करणार आहेत. युसाका यांचं नाव या जाहिरातीमुळे पहिल्यांदाच चर्चेत आहे असं नाही. यापूर्वी त्यांनी आपल्या ट्विटर फॉलोअर्सना ६३ कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. जपानमध्ये बेसिक इनकम आयडियावर चर्चेसाठी फॉलोअर्सला पैसे देण्याची घोषणा त्यांनी केली होती.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times