नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भाजप कार्यकर्त्यांशी शुक्रवारी संवाद साधला. कृषी विधेयकांना विरोध करणाऱ्या (Farm Bills 2020) विरोधी पक्षांवर पंतप्रधान मोदींनी निशाणा साधला. तसंच भाजप कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांमध्ये जाऊन या विधेयकांबाबत असलेल्या शंकांचं निरसण करावं, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. स्वातंत्र्यापासून ‘शेतकरी आणि मजुरांना गुंतागुंत असलेली आश्वासनं आणि कायदे मिळालेले आहेत’ आणि आता आपल्या सरकारने त्यात मोठ्या सुधारणा करून महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर टीका केलीय.

संसदेत मंजूर झालेल्या तीन कृषी विधेयकांचा पंजाब आणि हरयाणातील शेतकरी निषेध करत आहेत. या दरम्यान पंतप्रधान मोदींनी भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ‘सर्व भाजपा कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संपर्क साधावा आणि नवीन कृषी सुधारणांचे महत्त्व व माहिती त्यांना सोप्या शब्दात सांगावी. ही ही विधेयकं त्यांना कशी सक्षम करतील हे शेतकऱ्यांना पटवून द्यावं. शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधल्याने सोशल मीडिया आणि व्हर्च्युअल जगातून पसरलेल्या विरोधकांच्या चुकीच्या प्रचाराला सडेतोड उत्तर मिळेल, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं.

‘शेतकऱ्यांशी कायम खोटे बोलणारे आता आपल्या राजकीय स्वार्थासाठी शेतकऱ्यांना गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. हे लोक अफवा पसरवत आहेत. अशा प्रकारच्या अफवांपासून शेतकऱ्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी भाजपा कार्यकर्त्यांची आहे. आम्हाला शेतकऱ्यांचे भविष्य उज्ज्वल करावे लागेल, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी विरोधकांना टोला लगावला. शेतकरी व कामगारांच्या नावावर देशात अनेक वेळा सरकारं तयार झाली. पण शेतकऱ्यांना काय मिळालं? केवळ आश्वासनं आणि कायद्यांची गुंतागुंत असलेलं जाळं. असा सापळा जो शेतकरी किंवा मजूर यांना समजू शकला नाही. शेतकऱ्यांना अशा कायद्यांमध्ये अडकवून ठेवले गेलं, त्यामुळे त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना स्वत: चं उत्पादनही विकता आलं नाही. परिणामी, उत्पादन वाढूनही, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात तेवढी वाढ झाली नाही. पण त्यांच्यावर कर्जाचं ओझं मात्र नक्की वाढलं, असा घणाघाती आरोप पंतप्रधान मोदींनी विरोधी पक्षांवर केला.

कर्ज घेण्यास भाग पाडणाऱ्या शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने महत्त्वपूर्ण काम सुरू केलं आहे. आता अनेक दशकांनंतर शेतकऱ्याला त्याच्या उत्पादनाचा हक्क मिळाला आहे. शेतीत झालेल्या सुधारणांचा सर्वाधिक फायदा अल्पभूधारक आणि मार्यादित शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.

‘गरीब, शेतकरी, कामगार आणि महिला हे सर्व आत्मनिर्भर भारताचे बळकट आधारस्तंभ आहेत. म्हणून त्यांचा स्वाभिमान आणि गौरव हे आत्मनिर्भर भारताची शक्ती आणि प्रेरणा आहे. सशक्तीकरण करूनच भारताची प्रगती शक्य आहे. प्रत्येकजण आत्मनिर्भरतेच्या व्यापक मोहिमेत सहभागी व्हावं आणि प्रत्येकास संधी मिळावी. पंडित दीनदयाळ यांचं स्वप्न पूर्ण करण्याचा हा प्रयत्न आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंजाब आणि हरयाणाचे शेतकरी कृषी विधेयकांना मोठ्या प्रमाणात विरोध करत रस्त्यावर उतरत आंदोलन करत आहेत. त्याचबरोबर विरोधी पक्षांनीही या आंदोलनात शेतकऱ्यांच्या पाठिंबा दिला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here