म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूरः पालनपोषणाचा खर्च करता येत नसल्याने मुलाला बेकायदेशीररित्या दत्तक दिल्याप्रकरणी वडिलांसह एका तृतीयपंथी यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश बालकल्याण समितीने दिले आहेत. दरम्यान, या प्रकरणात मदत करणारे डॉक्टर व वकिलावरही गुन्हा दाखल करावा अशीही सूचना या समितीने केली आहे.
लॉकडाउनच्या काळात आर्थिक अडचणीत सापडलेल्या उत्तम पाटील या चांदी कारागिराने आपल्या दहा वर्षांच्या मुलास एका तृतीयपंथीयास दत्तक दिले होते. यासाठी त्याने पाच लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. याबाबत मुलाच्या आजीने तक्रार केल्यानंतर त्या मुलाला बालकल्याण संकुल मध्ये ठेवण्यात आले आहे.
बालकल्याण समितीने चौकशी केल्यानंतर दत्तक प्रकरण बेकायदेशीर असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर या समितीने या प्रकरणातील वडील उत्तम पाटील व दत्तक घेणारा तृतीयपंथी आणि त्याला मदत करणारे डॉक्टर, वकिल यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना दिल्या. यामुळे पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू केले आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times