म. टा. प्रतिनिधी, सांगली: जिल्ह्यातील मृत्युदर रोखण्यासाठी करोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे ऑडिट होण्याची गरज पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार डॉक्टरांच्या कामाचे ऑडिट करण्यासाठी जिल्ह्यात २२ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकांकडून जिल्ह्यातील कोव्हिड उपचार केंद्रांसह खासगी रुग्णालयांमधील डॉक्टरांच्या कामाचे ऑडिट होणार आहे. यातील १२ पथके महानगरपालिका क्षेत्रात, तर १० पथके ग्रामीण भागात काम करणार आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना डॉ. साळुंखे म्हणाले, ‘गेल्या आठवड्यात पालकमंत्री जयंत पाटील यांनी डॉक्टरांच्या उपचारपद्धतीकडे लक्ष देण्याची गरज असल्याची खंत व्यक्त केली होती. त्यानुसार प्रशासनाने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. करोनाचे संकट दिवसेंदिवस वाढू लागले असल्याने प्रशासनासह आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी वाढली होती. रुग्ण वाढत असताना आरोग्य यंत्रणा कमी पडली. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांची उपचार घेण्यासाठी दमछाक झाली. सरकारी रुग्णालयांवरील ताण कमी करण्यासाठी खासगी रुग्णालयांत उपचार सुरू करण्यात आले. सांगली, मिरज शहरासह इस्लामपूर, तासगाव, विटा, आटपाडी, कवठेमहांकाळ आणि जत याठिकाणी खासगी रुग्णालये अधिग्रहित केली आहेत. जिल्हा प्रशासनाने खासगी रुग्णालयांना ६५ व्हेंटीलेटरचा पुरवठा केला. ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येही ऑक्सिजनयुक्त खाटांची व्यवस्था केली आहे. मात्र, उपचारपद्धती आणि बिलांबाबत रुग्णांच्या तक्रारी वाढल्या होत्या. पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार डॉक्टरांकडून योग्य पद्धतीने उपचार होतात का, याचे ऑडिट करण्यासाठी २२ पथके तयार केली आहेत.’

‘महानगरपालिका क्षेत्रात १२, तर ग्रामीण भागात १० अशी २२ पथके कार्यरत राहतील. एका पथकामध्ये दोन डॉक्टरांचा समावेश आहे. या पथकांकडून रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णाची परिस्थिती आणि डॉक्टरांकडून दिल्या जाणाऱ्या उपचाराची पाहणी केली जाणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या आदेशानुसार रुग्णालयात सेवा देण्यात येत आहे का, डॉक्टरांचे वैयक्तिक लक्ष आहे का, ते वेळोवेळी रुग्णांची तपासणी करतात काय, याशिवाय हॉस्पिटलमधील रुग्णांच्या कागदपत्रांची तपासणी करणार आहेत. येत्या दोन दिवसात पथकांचे कामकाज सुरू होईल, असेही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. साळुंखे यांनी सांगितले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here