नाशिक शहरात बाधितांच्या वाढत्या संख्येला गेल्या आठवड्यापासून काहीसा लगाम बसला असून, बाधितांच्या संख्येचा आलेख कमी होताना दिसत आहे. ही दिलासादायक बाब असून, अॅक्टिव्ह रुग्णसंख्याही पाच हजारांवरून थेट साडेतीन हजारांवर आली आहे. त्यामुळे नाशिक शहरातील करोना बाधितांचा हा राज्यात सर्वाधिक ९१.०५ टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्याचा रिकव्हरी रेट ७५.०९ टक्के असून, त्या मानाने नाशिकचा रिकव्हरी रेट १५ टक्के अधिक आहे. चाचण्यांची संख्या वाढवल्यामुळे आणि वेळीच रुग्णांवर उपचार केल्यामुळे रिकव्हरी रेट वाढल्याचा दावा वैद्यकीय विभागाने केला आहे.
राज्यात मुंबई, पुण्यात करोनाचे थैमान सुरू असताना नाशिकमध्ये सुरुवातीला करोनाची स्थिती नियंत्रणात होती; परंतु अनलॉक झाल्यानंतर करोनाचा प्रसार वेगाने फैलावला. शहरातील करोनाबाधितांची संख्या ३० मे रोजी २३७ होती, तर १० जणांचा मृत्यू झाला होता. मात्र, अनलॉकनंतर साडेतीन महिन्यांत शहरातील रुग्णसंख्येने ४७ हजारांचा टप्पा ओलांडला. मृत्युसंख्याही ६७९ पर्यंत पोहोचली. त्यामुळे करोनाची स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेने विविध उपाययोजनांवर भर दिला. विशेषत: करोनाबाधित रुग्णांचे ट्रेसिंग वाढविण्यात आले असून, चाचण्यांचेही प्रमाण वाढविण्यात आले आहे. त्यातच मिशन झिरोअंतर्गत प्रभागांमध्ये जाऊन चाचण्या केल्या जात आहेत. एका करोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील जवळपास ३५ रुग्णांना ट्रेस केले जात आहे. त्यामुळे करोनाच्या नियंत्रणात महापालिकेला काहीसे यश आल्याचे चित्र आहे. जूनमध्ये नाशिकमधील रुग्ण बरे होण्याचा दर ४२.६० टक्के होता. जुलैत त्यात वाढ होऊन रिकव्हरी रेट ७१ टक्क्यांपर्यंत पोहोचला, तर सप्टेंबरमध्ये हा रेट ९० टक्क्यांच्या पुढे गेला आहे. नाशिक ग्रामीण आणि राज्यातील अन्य महापालिकांपेक्षाही हा दर सर्वाधिक आहे. त्यामुळे नाशिकमधील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण राज्यात सर्वाधिक असल्याने नाशिककरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
अॅक्टिव्ह रुग्णसंख्याही घटली
नाशिक शहरात सद्य:स्थितीत करोनाबाधितांची संख्या ४६,८४३ पर्यंत पोहोचली आहे. सध्या ३,५३४ अॅक्टिव्ह रुग्णसंख्या आहे. शहरातील अॅक्टिव्ह रुग्णसंख्या ही सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात साडेसहा हजारांपर्यंत पोहोचली होती. मात्र, ही संख्या नियंत्रणात आणण्यात प्रशासनाला यश आले आहे. सध्या ४२ हजार ६५० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, ३,५४० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे करोनाची स्थिती नियंत्रणात आणण्यात प्रशासनाला काहीसे यश येत असल्याचे चित्र आहे.
चाचण्यांची संख्या वाढविण्यात येऊन जास्तीत जास्त रुग्णांचे ट्रेसिंग केले जात आहे. त्यामुळे नाशिकचा रिकव्हरी रेट हा चांगला आहे. अॅक्टिव्ह रुग्णसंख्याही कमी होत असून बाधितांचेही प्रमाण कमी होत आहे. करोना नियंत्रणासाठी प्रशासनाच्या प्रयत्नांना यश येत आहे.
– कैलास जाधव, आयुक्त, महापालिका
रिकव्हरी रेट
नाशिक जिल्हा
जून ४२.६० टक्के
जुलै ७१ टक्के
ऑगस्ट ८४ टक्के
सप्टेंबर ९१.०५ टक्के
विभागनिहाय आढावा
नाशिक ग्रामीण ८०.५१ टक्के
मालेगाव ८०.४२ टक्के
जिल्हाबाह्य ६८.८४ टक्के
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times