म.टा.प्रतिनिधी, नगर: महापालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडणुकीतून शिवसेनेने माघार घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे उमेदवाराची सभापतीपदी बिनविरोध निवड झाली. मात्र, या प्रकारानंतर ‘ नगर’ या फेसबुक पेजवर ज्या पद्धतीने या निवडणुकीबाबत पोस्ट करण्यात आल्या आहेत, त्याची चांगलीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. यामुळे नगरच्या शिवसेनेत सर्व काही अलबेल आहे का, असा प्रश्नही निर्माण झाला आहे.

नगरच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी काल नगरसेवक मनोज कोतकर यांची बिनविरोध निवड झाली. कोतकर यांनी ऐनवेळी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता, व राष्ट्रवादीकडूनच स्थायी समिती सभापती पदासाठी अर्ज भरला होता. तर, कोतकर यांच्या विरोधात शिवसेनेचे योगीराज गाडे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र, गाडे यांनी या निवडणुकीतून माघार घेतली. वरिष्ठाच्या निर्णयानुसार ही माघार घेतली असल्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख तसेच आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले होते. मात्र, त्यातच या सभापती निवडीपासूनच ‘शिवसेना नगर’ या फेसबुक पेजवर या निवडणुकीवर भाष्य करणाऱ्या पोस्ट सुरू झाल्या आहेत.

‘अनिल भैया असले असते… तर माघार घेण्याची वेळ आली नसती. स्थायी समिती सभापती शिवसेनेची माघार.. अभिनंदन,’ ही पोस्ट केल्यानंतर लगेच या फेसबुक पेजवर माजी मंत्री अनिल राठोड यांचा फोटो टाकून ‘तुमची कमतरता खरोखर आज भसते, शिवसेनेने घेतली आज माघार…’ अशी पोस्ट करण्यात आली. त्याचसोबत ‘महाविकास आघाडीच्या नावाखाली पुढचा महापौर सुद्धा राष्ट्रवादीचा होणार असे डिकलएर करून टाकावा,’ ‘उद्या काही शिवसेनेच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादीचे पंचे घालून दिसले, जास्त विचार करू नये हे तर आता होतच राहणार,’ ‘खऱं दुःख तर तेव्हा वाटतं, जेव्हा आयुष्यभर एखाद्याला आपण त्यांच्या गुणामुळे विरोध करतो व एखाद दिवशी त्यांच्याच मांडीला मांडी लावून, हो हो म्हणायची वेळ येते. कटू आहे पण सत्य आहे. नगरचा राम गेल्याने हे होणारच होत, जय महाराष्ट्र,’ अशा विविध पोस्ट या फेसबुक पेजवर दिसू लागल्या आहेत. त्यामुळे आता या पोस्टची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली असून यामुळे नगरच्या शिवसेनेत सर्व अलबेल आहे का, असाही प्रश्न निर्माण होऊ लागलाय.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here