भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली. या कार्यकारिणीत महाराष्ट्रातून पाच नेत्यांना स्थान देण्यात आलं आहे. पंकजा मुंडे, विनोद तावडे, सुनील देवधर, विजया रहाटकर यांना सचिवपदाची तर, हीना गावित यांना प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पंकजा मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून नव्या जबाबदारीबद्दल आनंद व्यक्त केला आहे. आपल्यावर विश्वास दाखवल्यावर पंकजा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह सर्व केंद्रीय नेत्यांचे आभार मानले आहेत. तसंच, आपल्या टीममध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल नड्डा यांचेही आभार मानले आहेत.
मागील विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून पंकजा मुंडे यांना कोणती जबाबदारी मिळणार याची सतत चर्चा होती. त्या नाराज असल्याचंही बोललं जात होतं. विधान परिषदेवर संधी देऊन त्यांची नाराजी दूर केली जाईल, अशी चर्चा होती. मात्र, तसं झालं नाही. पक्षानं नव्या चेहऱ्यांना संधी दिली. त्याचवेळी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी देण्याचा पक्षाचा विचार असल्याचं सुतोवाच केलं होतं. त्यानुसार त्यांना ही संधी मिळाली आहे.
आणखी वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times